महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

माढ्यातील माजी आमदार धनाजी साठे 'कमळ' सोडण्याच्या वाटेवर

भाजपमधील पक्षश्रेष्ठीकडून निर्णय प्रक्रियेत विचार केला जात नाही. सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने साठे पक्षावर कमालीचे नाराज झालेत.

धनाजी साठे

By

Published : Apr 10, 2019, 9:01 PM IST

सोलापूर- माढ्यातील भाजपमध्ये असलेले माजी आमदार धनाजी साठे हे भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या रणधूमाळीत निर्णय प्रक्रियेत घेतले जात नसल्याचा सूर साठे यांच्या कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.


सध्या माढा लोसभा मतदार संघ हा चर्चेत आहे. भाजपमधील पक्षश्रेष्ठीकडून निर्णय प्रक्रियेत विचार केला जात नाही. सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने साठे पक्षावर कमालीचे नाराज झालेत. त्यातच कार्यकर्त्यांची त्यांनी माढ्यात बैठक घेतली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी पक्षावर नाराजीचा सूर दर्शवला.


त्यामुळे साठेंची भूमिका काय असणार याकडे मतदार संघाचे लक्ष वेधले गेले आहे. दोन दिवसात आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे माजी आमादर धनाजी साठे यांनी सांगितले. माढा शहरासह तालुक्यात धनाजी साठे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शिवाय साठे यांचे नातेवाईक माण-खटाव भागात देखील आहेत. त्यामुळे नाराज झालेल्या साठे यांची मनधरणी करण्यात भाजप यशस्वी ठरणार की साठे दुसरी भूमिका घेणार याचाही या निवडणुकीवर परिणाम होणार आहे. विकासाला गती मिळेल अन् सामान्यांचे प्रश्न सुटतील या हेतूनेच काँग्रेसमधून भाजपत गेलो. मात्र आजच्या घडीला मी भाजपत आहे, काय असा प्रश्नच मला पडला आहे, असे माजी आमदार साठे यांनी सांगितले.

माजी आमदार धनाजी साठे


माढा नगर पंचायत साठेंच्या ताब्यात-


माजी आमदार धनाजी साठे यांच्या ताब्यात माढा नगरपंचायत असून संत कुर्मदास कारखाना तसेच विविध शैक्षणिक संस्था ते चालवत आहेत. कार्यकर्त्यांचे पसरलेले जाळे तसेच संस्थेमधील कर्मचाऱ्यांचे संख्याबळ लक्षात घेता माजी आमदार धनाजी साठे हे सध्याच्या परिस्थितीमध्ये भाजपपासून दूर जाणे भाजपला अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.


माजी आमदार धनाजी साठे व राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मैत्रिचे नाते किती घट्ट होते, हे सर्वपरिचित आहे. विलासराव देशमुख यांच्यामुळे काँग्रेसमध्ये उभारी घेतलेले माजी आमदार साठे हे विलासराव यांच्या जाण्याने पक्षात बेचैन झाले होते. त्यातच 2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमादर साठे यांचे पुत्र दादासाहेब साठे यांना तिकीट जाहीर करण्यात आले. मात्र ऐन वेळेस पक्षातील जिल्हा पातळीवरील नेते मंडळींकडून उमेदवारीसाठी पैश्यांची मागणी करण्यात आल्याची अॅडीओ क्लिपचा पूरावा देत त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला. दादासाहेब साठे यांनी माढ्याची निवडणूक ही भाजप पूरस्कृत म्हणून लढविली आणि भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपला अच्छे दिन आले, मात्र मात्र भाजपमध्ये पाच वर्ष येऊन देखील माजी आमदार साठे असोत की त्यांचा सामान्य कार्यकर्ता यांना पक्ष प्रवाहात सामील करुन घेतले नाही. सन्मानाची वागणूक ही देण्यात आलेली नाही. त्यामुळे साठे गट आता कोणते पाऊल टाकणार याची भूमकिा जाहीर करणार आहेत.

कोण आहेत माजी आमदार धनाजी साठे


सोलापूर जिल्हातील सहकार महर्षी दिवंगत गणपतराव साठे यांचे धनाजी हे पुत्र आहेत. माढ्यातील साठे घराणे पारंपरिक काँग्रेस पक्षात कार्यरत होते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी धनाजी साठे यांची घनिष्ठ मैत्री होती. विलासरावांच्या मैत्रितूनच राजकीय क्षेत्रात त्यांनी भरारी घेतली. धनाजी साठे हे दोन वेळा आमदार होते. त्यांच्या पत्नी मंदाकिनी साठे या जिल्हा परिषद सदस्या होत्या. तर त्यांचे पुत्र सध्या भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे आहेत. तर स्नूषा अॅड. मीनल साठे या माढ्याच्या नगराध्यक्षा तसेच जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या आहेत.

'या'साठी नाराजी


शासनाच्या विविध समित्या गठीत करताना साठे गटाच्या कार्यकर्त्यांना डावलले गेले. पक्षांच्या निर्णय प्रक्रियेत साठे गटास विश्वासात घेतले जात नाही. भाजपत सहभागी झालेल्या साठे गटाच्या ताब्यात असलेल्या माढा नगरपंचायतीस कायम स्वरूपी अधिकारी दिले नाहीत. तसेच साठे यांच्या ताब्यातील संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्यास सरकारकडून अपेक्षित सहकार्य मिळालेले नाही. जिल्ह्यात सहा साखर कारखान्यावर आरआरसीची कारवाई झाली. मात्र केवळ कुर्मदास सहकारी साखर कारखान्याच्या साखर गोदामास सील ठोकले गेले. भाजपत असताना हे सगळे घडले. तर दूसरीकडे आता काँग्रेसमध्ये असलेल्या नेत्यांना साखर कारखान्यांना मदत करण्याचे आश्वासन देऊन पक्षात प्रवेश दिला जातो. जो भाजपमध्ये आहे त्यांच्या साखर कारखान्यांना मदत नाही आणि बाहेरून येणाऱ्यांना मदत दिली जात असल्यामुळेही साठे नाराज झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details