सोलापूर - बार्शी येथील डॉ. संजय अंधारे रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील स्टाफचा गलथानपणा रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. रुग्णांची देखभाल करण्यात स्टाफकडून दुर्लक्ष होत आहे. परिणामी हा दुर्लक्षपणा रुग्णांच्या जीवावर बेतत असल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. या रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी करत सोमवारी दुपारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात संदीप सुतार या युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. संदीप सुतार यांच्या आई आशा सुतार यांचा मृत्यू डॉ. अंधारे यांच्या सुश्रुत रुग्णालयात झाला होता. या रुग्णालयाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सुतार करत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेल्या पोलिसांनी वेळीच संदीप सुतार या युवकाला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न - आत्मदहन करणाऱ्या आंदोलकाच्या आईचा रुग्णालयात मृत्यू झाला होता-
संदीप चत्रभूज सुतार (रा. लक्ष्मीबाई जगदाळे सोसायटी बार्शी, सोलापूर) यांनी आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. 13 एप्रिल 2021 रोजी संदीप सुतार यांच्या आई आशा सुतार यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. सुमारे 16 दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना निमोनिया झाल्याचे संबंधित रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, 2 जून रोजी संदीप सुतार यांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले होते. त्यामध्ये त्यांनी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील स्टाफ मध्यरात्री 1 ते पहाटे 5.45 दरम्यान झोपी जातो. दरम्यानच्या काळात गंभीर रुग्णांची देखभाल केली जात नाही. यावेळेत एखादा रुग्ण दगावल्यास त्या रुग्णांच्या बाबतीतील नोंदविलेली महत्वाची निरीक्षणे फाडून टाकली जातात असेहि निवेदनात नमूद करण्यात आले होते. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील स्टाफबाबत तक्रार करूनही डॉ. संजय अंधारे त्यांना पाठीशी घालत आहेत. या रुग्णालयाची कोविड मान्यता रद्द करुन सुश्रुत या रुग्णालयाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी यापूर्वी केली आहे.
- अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊनही कारवाई झाली नाही-
बार्शी येथील रुग्णालयातील स्टाफकडून होत असलेल्या गलथानपणाबाबत तसेच बेफिकीरप्रकरणी नातेवाईकांनी यापूर्वी निवेदन दिले होते. आजतागायत कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन दिले होते. संबंधित रुग्णालयावर कारवाई होत नसल्याने अखेर आज सोमवारी दुपारी संदीप सुतार या युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच ताब्यात घेऊन युवकाचे प्राण वाचवले आहे.
हेही वाचा -मराठा आरक्षणप्रश्नी सरकार सकारात्मक- श्रीमंत शाहू छत्रपती