सोलापूर -सोलापुरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सिव्हिल रुग्णालयात ( Solapur Civil Hospital ) उपचार सुरु असणाऱ्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्या मृत रुग्णाचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना धक्कादायक प्रकार आढळून आला आहे. मृताच्या सर्वांगांवर मुंग्या लागल्या ( Ants Hit Dead Body ) होत्या. या प्रकारानंतर सिव्हिल रुग्णालयाच्या कारभारावर नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
शहारातील बुधवार पेठ येथील राकेश मोरे ( वय 20 ) या युवकावर मागील चार दिवसांपासून सिव्हिल रुग्णालयात क्षयरोग (टीबी) या आजारावर उपचार सुरु होते. मात्र, रविवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान राकेशचा उपचारावेळी मृत्यू झाला. याबाबत अधिकृत माहिती डॉक्टरांनी राकेशच्या नातेवाईंकांना दिली आहे. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना तेथील प्रकार पाहून धक्काच बसला. मृताच्या सर्वांगावर मुंग्या लागल्या होत्या. राकेशला लावण्यात आलेल्या ऑक्सिजन मास्कला ही मुंग्या लागल्या होत्या. त्यामुळे सिव्हिल रुग्णालयातील प्रशासनाचा हलगर्जीपणा याला जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.