पंढरपूर -कोरोना पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आषाढी वारी सोहळा हा प्रातिनिधिक स्वरूपाचा करण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपूर शहरात सात दिवसाची तर आसपासच्या गावांमध्ये चार दिवसाची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. स्थानिक नागरिक व आमदारांकडून विरोध झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदीबाबत फेरविचार करत निर्णयांमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. याबाबचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत...
पंढरपूर शहरात आठ दिवस तर तालुक्यात चार दिवसाचे संचारबंदी
पंढरपूर शहरात आषाढी काळात भाविकांची गर्दी होऊ नये. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कठोर निर्बंध घातले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून पहिल्यांदा नऊ दिवसाची सरसकट संचारबंदी लागू केली होती. मात्र त्याला स्थानिक नागरिकांसह आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांचा विरोध झाला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आता पंढरपूर शहरात 18 जुलै ते 24 जुलै दरम्यान संचारबंदी लागू असणार आहे. यात पंढरपूर शहरातील प्रदक्षणा मार्ग आतील बाजूस, सर्व घाट वाळवंट परिसर, मंदिर परिसर तसेच गोपाळपूर येथे सात दिवसाची संचारबंदी असणार आहे. पंढरपूर तालुक्यातील वाखरी, भटुंबरे, गादेगाव, चिंचोली भोसे, लक्ष्मी टाकळी, शेगाव दुमाला, कोर्टी, शिरढोण, कैठाळी या गावात 18 जुलै ते 22 जुलै दरम्यान संचारबंदी असणार आहे. या काळात कोणत्याही नागरिकाला घराबाहेर कामाशिवाय पडता येणार नाही. याठिकाणी अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार आहे.