पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये हॉटेलच्या गेटवर लघुशंका केल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एका तरुणाचे अपहरण करुन खून केल्याचे समोर आले आहे. हितेश गोवर्धन मूलचंदानी (वय 24) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी रोहित किशोर सुखेना (वय 26. रा. पिंपरी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस अधिकारी घटनेची माहिती देताना अमीन फिरोज खान, शाहबाज सिराज कुरेशी, आरबाज शेख, अक्षय संजय भोसले, लंगडा यांच्यावर पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हा कुणाल हॉटेलचा मालक असून तो रात्री उशिरा हॉटेलमध्ये उपस्थित होता. वेटर साहिल ललवाणी आणि कैलास पाटीलसह सात जण कामगार हॉटेलमध्ये काम करत होते. चारचाकी वाहनातून संबंधित आरोपी रात्री तीनच्या सुमारास बिअर घेण्यासाठी आले होते. त्यावेळी आरोपींपैकी, अमीन खानने हॉटलेच्या गेट जवळ लघुशंका केली. त्यावेळी साहिल ललवाणी याने इथे लघुशंका करू नका असे सांगितले. याचाच राग मनात धरून अमीनने त्याला शिवीगाळ केली आणि कामगार कैलास पाटीलच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून जखमी केले.
हे पाहून हॉटेलमधील इतर कर्मचारी आणि मालक बाहेर आले. त्यांनी अमीनला पकडले. तेव्हा इतर सोबतच्या मित्रांनी चारचाकीसह धूम ठोकली. पळत गेलेल्या आरोपीच्या पाठीमागे फिर्यादीचा चुलत भाऊ लखनचा मित्र हितेश हा धावत गेला. तेव्हा संबंधित आरोपींनी त्याचे अपहरण करून त्याच्यावर कोयत्याने आणि चाकूने सपासप वार करून त्याचा खून केला. या घटनेप्रकरणी एकाला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर चार जण अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध पिंपरी पोलीस घेत आहेत.