पुणे -पुणेकरांवरील पाणी कपातीचे संकट दूर झाले आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारीही धरणांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने 20 टीएमसीपेक्षा अधिक पाणी धरणात जमा झाले आहे. 26 जुलैनंतरही शहरात कोणत्याही प्रकारची पाणी कपात लागू होणार नाही. ( Water Supply to Pune ) वर्षभर नियमीत पाणी पुरवठा केला जाईल, असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले आहे.
जून महिन्यात पावसाने पुणे शहर ( Pune City ) व खडकवासला धरण प्रकल्पाकडे पाठ फिरवली. त्यामुळे धरणात केवळ 2.50 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. महापालिकेकडून ( Municipal Corporation ) रोज 1600 एमएलडी पाणी धरणातून उचलले जात होते. पाऊस लांबणीवर पडल्याने पाणीसाठा झपाट्याने खाली जात होता. त्यामुळे जलसंपदा विभागाने पाण्याचा काटकसरीने वापर करा, असे पत्र महापालिकेला पाठवले होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने 4 जुलै ते 11 जुलै या दरम्यान एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता.