पुणे- ग्राहक म्हणून आलेल्या दोघांनी लॉजमालकाच्या डोक्यात हातोड्याने वार करुन पळ काढला. रवींद्र अग्रवाल (वय ७२) असे जखमी लॉजमालकाचे नाव आहे. पुण्यातील कॅम्प परिसरात बुधवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
पुण्यातील कॅम्पात लॉजमालकाच्या डोक्यात ग्राहकाने केले हातोड्याने वार - लष्कर
पुण्यातील कॅम्प परिसरात बुधवारी दुपारी ग्राहक म्हणून आलेल्या दोघांनी लॉजमालकाच्या डोक्यात हातोड्याने वार करुन पळ काढला.
रवींद्र अग्रवाल यांची कॅम्प परिसरात राजतीलक लॉज आहे. बुधवारी दुपारी ते लॉजमध्ये असताना दोन व्यक्ती त्यांच्याजवळ आले. हे दोघेही पूर्वीचे ग्राहक असल्याने अग्रवाल यांनीही त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यानंतर त्यांच्यात किरकोळ वाद झाला आणि त्या दोघांपैकी एकाने रवींद्र अग्रवाल यांच्या डोक्यात हातोड्याचे तीन वार केले. तर दुसऱ्या व्यक्तीने अग्रवाल यांना पिस्तूलाचा धाक दाखवला. त्यानंतर त्या दोघांनीही तेथून पळ काढला.
यानंतर रवींद्र अग्रवाल यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका फुटेजमध्ये आरोपी दिसत आहेत. त्याआधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. या दोन्ही आरोपींना लवकरच जेरबंद करण्यात येणार असल्याची माहिती लष्कर पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत भोसले यांनी दिली.