पुणे- शहरातील बुधवार पेठेमधील पासोड्या विठोबा मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री फोडून त्यातील पैसे लंपास केले. आज पहाटे पूजाविधी करण्यासाठी गुरुजी आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पुण्यातील बुधवार पेठेत हे मंदिर आहे. या मंदिरात विठ्ठलाच्या मूर्तीजवळच दानपेटी ठेवली होती. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने ही दानपेटी फोडली आणि त्यातील रोख रक्कम पळवली.
पुण्यात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्याकडून बंद घरे तर टार्गेट केली जात आहेतच. परंतु,दिवसाढवळ्या घरफोड्याही होताना दिसत आहेत. आता तर मंदिरातील दानपेट्या फोडण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली असल्याचे या घटनेमुळे स्पष्ट झाले आहे.
पासोड्या विठोबा मंदिराचा इतिहास-
पूर्वी या परिसरात पासोड्या विकणारे लोक या विठ्ठल मंदिराजवळ बसत होते. या परिसरात त्यांची दुकाने होती. त्यामुळे या मंदिराला पासोड्या विठोबा मंदिर असे नाव पडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हे मंदिर अस्तित्वात आहे, असे सांगितले जाते.