पुणे -भाजपाच्या आमदार माधुरी मिसळ यांच्या घरी काम करणाऱ्या कामगार महिलेने माधुरी मिसाळ यांच्या लहान जावेच्या बेडरूममधून 18 लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्या कामगार महिलेचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी ममता दीपक मिसाळ (वय 51) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कामगार महिलेवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेडरूममध्ये ठेवले होते दागिने
ममता या भाजपाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या लहान जाऊ आहेत. ते एकत्र वानवडी परिसरात राहतात. दरम्यान, मिसाळ यांच्याकडे घर कामासाठी काही महिला आहेत. काही महिला या बेडरूम साफ-सफाईचेदेखील काम करतात. यादरम्यान फिर्यादी ममता यांनी त्यांच्या बेडरूममध्ये दागिने ठेवले होते.
14 लाख रुपयांचा हार आणि 4 लाख रुपयांचे कडे
लग्नानिमित्त त्यांना त्यातील 14 लाख रुपयांचा हार आणि 4 लाख रुपयांचे कडे परिधान करण्यासाठी हवे होते. यासाठी त्या दागिने आणण्यासाठी गेल्या. त्यांना बॉक्समध्ये ठेवलेले दागिने नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पती व मोठ्या जाऊ आमदार माधुरी मिसाळ यांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांना मोती असणारा हार आणि सोन्याचे कडे असा 18 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी वानवडी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.