पुणे- चाकण औद्योगिक वसाहतीतील महाळूंगे गावच्या हद्दीत असणाऱ्या एका कंपनीत पाण्याचा टँकर पुरवण्याच्या वादातून सहा हल्लेखोरांनी एका व्यावसायिक तरुणावर कोयत्याने वार करून, निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. संबंधीत आरोपी फरार झाले आहेत.
हत्येचे दृश्य सीसीटीव्हीत कैद उपचारादरम्यान मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी (दि. १४ मे) रोजी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास महाळुंगे (ता. खेड) येथील रेणुका हॉटेल समोर घडली. या हल्ल्यात अतुल तानाजी भोसले (वय २६, रा.भोसले वस्ती, महाळुंगे, ता.खेड, जि.पुणे) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर चाकण येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरु होते. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी चिंचवड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना दि. १५ मे रोजी पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
नेमके घडले काय?
याबाबत त्याचा मित्र अक्षय पंडित बोऱ्हाडे (वय २६, रा.महाळुंगे) याने हल्ला झाल्यानंतर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कंपनीला पाण्याचे टँकर पुरवण्यावरून अतुल भोसले व आरोपी अक्षय शिवळे यांच्यात फोनवरून बाचाबाची झाली होती. त्यामुळे आरोपींनी चिडून जाऊन हे कृत्य केले. याप्रकरणी आरोपी अक्षय अशोक शिवळे, गणेश ढरमाळे, गोट्या भालेराव (सर्व रा. महाळुंगे, ता. खेड, जि. पुणे) व तीन अज्ञात आरोपींवर खुनी हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी पसार झाले आहे.
पुढील तपास सुरु
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर, पोलीस उपनिरीक्षक महेश चिट्टपल्ले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर, गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार योगेश आढारी, पो.ह. बाळसराफ, पो.ह. हणमंते यांचे पथक पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा -'तौत्के' चक्रीवादळाच्या बेस्टला फटका; बेस्टच्या 109 गाड्यांत बिघाड