पुणे -महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एसटी आजपासून पूर्ण प्रवासी क्षमतेने धावत आहे. निम्म्या प्रवासी क्षमतेने धावणारी एसटी १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने एसटी महामंडळाला दिली. त्यामुळे एसटीचे आर्थिक नुकसान काही प्रमाणात तरी टळणार असून, प्रवाशांनाही दिलासा मिळाला आहे.
अंतरनियमांचे पालन करून एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांसह आंतरजिल्हा वाहतुकीस एसटीला २० ऑगस्टपासून परवानगी मिळाली होती. त्यामुळे लांब पल्ल्याच्या मार्गावर प्रवासी वाहतूक करताना ४४ ऐवजी २२ प्रवाशीच एसटीतून प्रवास करत होते. त्यामुळे एकाच मार्गावर धावणाऱ्या एसटीसाठी इंधन खर्च व मनुष्यबळही अधिक लागत होते. एसटीचा खर्चही वाढला. त्यामुळे १०० टक्के आसनक्षमतेने प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्याची मागणी एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे केली होती. त्यावर राज्य सरकारने एसटी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास अखेर परवानगी दिली. त्यामुळे आजपासून राज्यभर पूर्ण आसन क्षमतेने एसटी धावत आहे. एसटी प्रवासात प्रवाशांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच, बसचे निर्जंतुकीकरण केल्यानंतरच ती मार्गस्थ करण्यात येत आहे.