पुणे -भारतात अनेक थोर संत, क्रांतिकारक, विद्वान, तसेच अनेक साहित्यिक होऊन गेले. भारताने जगाला नेहमीच शांतता, प्रेम आणि सद्भभावनेचा संदेश दिला. आज या 130 करोड लोकसंख्या असलेल्या भारतात सर्व धर्मीय लोक हे गुण्यागोविंदाने राहतात आणि प्रेमाचा संदेश देतात. पण, अश्या प्रेमाच्या भारतात आम्हाला आमचे अधिकार मिळावे आणि आम्हालाही आमच्या प्रेमाबरोबर लग्न करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करत आज ( 5 मे ) पुण्यात हजारो एलजीबीटी समुहाच्या माध्यमातून प्राईड रॅलीचे आयोजन करण्यात आले ( LGBT Rally In Pune ) होते.
एलजीबीटी कम्युनिटीकडून पुण्यात आज प्राईड रॅली काढण्यात आली. पुण्यातील छत्रपती संभाजी महाराज बागेपासून या रॅलीला सुरुवात झाली. डेक्कनला वळसा घालून पुन्हा ही रॅली छत्रपती संभाजी महाराज बागेपशी समाप्त झाली. या रॅलीत मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. यावेळी प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं, अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच, सप्तरंगी मोठा ध्वज देखील यावेळी हातात धरण्यात आला होता.
समाजाचा एलजीबीटी समुहाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, त्यांना समानतेची वागणूक मिळावी. एलजीबीटी समुहाचा समाजाने तिरस्कार करु नये या हेतूने ही रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत एलजीबीटी समुहाच्या लोकांबरोबरच अनेक सामाजिक कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. रॅलीमध्ये विविध घोषणा लिहीलेले फलक हातात धरण्यात आले होते.