धक्कादायक.. सासऱ्याकडून सुनेचा लैंगिक छळ, पतीचीही मूक संमती - pune rape news
'माझा मुलगा तुला मूल देऊ शकत नाही तर मी देतो' असे बोलून सासऱ्याने सुनेचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
पुणे -पुण्याच्या चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र प्रकार समोर आलाय. एका 27 वर्षीय सुनेचा सासऱ्याने लैंगिक छळ केल्याचे उघडकीस आले आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे या सर्व प्रकाराला पतीचीही मूक संमती होती. वारंवार होणाऱ्या या प्रकाराला कंटाळून अखेर सुनेने पोलिसात धाव घेतली. त्यानंतर चंदनगर पोलिसांनी याप्रकरणी नवरा सासू-सासरे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित महिला ही कुटुंबीयांसोबत हडपसर परिसरात राहते. या महिलेला मूलबाळ नाही. त्यामुळे पती, सासू-सासरे आणि इतर आरोपी तिचा वारंवार छळ करत होते. पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरून पन्नास लाख रुपये घेऊन यावेत यासाठी आरोपींनी पीडित महिलेला शिवीगाळ करून वारंवार मारहाणही केली आहे.
यातील आरोपी सासर्याने तर नातेसंबंधाच्या सर्व परिसीमा ओलांडल्या. त्याने सुनेला 'माझा मुलगा तुला मूल देऊ शकत नाही तर मी देतो' असे बोलून तिचा लैंगिक छळ केला. तर आणखी एका आरोपीने 'नवऱ्यापासून तुला मुलगा झाला नाहीतर मी आहेच की' असे म्हणून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. दरम्यान हा प्रकार वारंवार होऊ लागल्याने पीडित महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात याची तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.