पुणे - लेटरहेडवर डेक्कन ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षकाच्या विरोधात केलेला तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी तक्रारदार महिलेकडे तब्बल 50 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर रामचंद्र आल्हाट यास अटक ( RTI Activist Arrested For Demand Extortion ) केली आहे. त्याच्यासह सुभाष उर्फ अण्णा जेऊर, निलेश जगताप, विवेक कोंडे, यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ( Pune Police ) खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण..?
कोथरूड परिसरातील एका 48 वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादीच्या पतीवर 2018 आणि 2020 मध्ये डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत तक्रारदाराने सुधीर आल्हाट याच्याकडे संपर्क केला होता. त्यावेळी आल्हाट याने तुम्हाला त्रास दिल्याचे 8 दिवसांत पैसे काढून देतो. माझ्या पोलीस खात्यात मोठ्या पदावरील तसेच अति वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी ओळखी आहेत, असे सांगत महिलेला तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे व पोलीस नाईक ज्ञानेश्वर पालवे यांच्या विरुध्द सुधीर रामचंद्र आल्हाटने लेटरहेडवर अर्ज करण्यास भाग पाडले. त्यानंतर आल्हाटने तक्रारदार महिलेला घरी बोलावून संतोष सोनवणे अर्ज प्रकरणात 50 लाखांच्या खंडणी मागणी मागितली. पैसे दिले तरच तुम्ही सोनवणे व पालवे यांच्या विरोधातील अर्ज मागे घेऊन देईल, असे सांगितले. खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आल्हाट याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.