महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात हेल्मेटवाले चक्रावले, पोलिसांनी पावती फाडण्याऐवजी दिले गिफ्ट व्हाऊचर - helmet wearing riders

हेल्मेट स्कीचा प्रयोग पुण्यात फसला असला तरी पोलिसांनी हार मानलेली नाही. हेल्मेट वापरण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी निरंतर सुरू ठेवलंय. हेल्मेट घालून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना चक्क गिफ्ट देण्याची मोहिम पुणे पोलीस राबवीत असल्यामुळे पुणेकर चकित झाले आहेत.

पुणे पोलीस

By

Published : Jun 14, 2019, 6:21 PM IST

Updated : Jun 14, 2019, 8:26 PM IST

पुणे - चौकाचौकात वाहतुकीचे नियमन करणारा ट्रॅफिक पोलीस दिसला की अनेकांना घाम फुटतो...त्यांनी पकडल्यास आपला खिसा रिकामा होणार असा अनेकांचा समज असतो. पुण्यातील प्रमुख रस्त्यावर मागील काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांची कारवाई जोरात सुरू आहे.

पुण्यात हेल्मेटवाले चक्रावले

सीसीटीव्हीच्या माध्यमातून नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होत आहे. दिसला दुचाकीस्वार की घ्या बाजुला अन् फाडा पावती, असे प्रकार सुरू आहेत. परंतु आज मात्र याच प्रमूख रस्त्यावर वेगळे चित्र दिसत होते. दंडाची पावती फाडणारे हेच पोलीस वाहनचालकांना गिफ्ट व्हाऊचर वाटत होते. आतापर्यंत वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे पैसे वसूल करणारे पोलीस आता वाहतूकीचे नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना गिफ्ट व्हाऊचर वाटताना दिसून आले.

वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहनचालकांसाठी पुणे पोलिसांनी आधार योजना सुरू केली आहे. "वाहतूक शिस्तीचे नियम पाळा, आणि झकास गिफ्ट कुपन मिळवा" अशी ही योजना आहे.

या योजनेअंतर्गत वाहतूकीचे नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना गिफ्ट व्हाऊचरचे वाटप करण्यात येणार आहे. कारवाईदरम्यान एखाद्या वाहनचालकावर वाहतुकीचे नियम मोडल्याचा दंड नसल्याचे लक्ष्यात आल्यानंतर अशा वाहनचालकाला पोलिसांच्या वतीने गिफ्ट व्हाऊचर देण्यात येणार आहे. शहरातील रेस्टारंट, हॉटेल्स, गारमेंट शॉप, सराफा दुकान, मॉल्स या ठिकाणी खरेदी केल्यानंतर वाहनचालकाना हे व्हाऊचर दाखवताच 10 ते 15 टक्के सुट मिळणार आहे.

मागील पाच महिन्यात पुणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमभंगापोटी तब्बल 48 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. यातील 20 कोटी फक्त हेल्मेट न वापरल्यामुळे वसूल केलेला दंड आहे. न्यायालयाच्या निर्णायाचा दाखला देत पुणे पोलिसांकडून शहरात हेल्मेटसक्तीची प्रभावीपणे करण्यात येत आहे. पोलिसांच्या या निर्णयाचा पुणेकरांनी कडाडून विरोध केला. हेल्मेटकृती विरोधी समितीने तर या निर्णयाविरोधात पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढला होत. परंतू तरीही पोलिसांनी माघार न घेता हेल्मेटसक्ती सुरुच ठेवली. त्याचा परिणामही लवकरच बघायला मिळाला. दुचाकी अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी झाली.

या उपक्रमविषयी माहिती देताना वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख म्हणाले, शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी केवळ दंडात्मक कारवाई करून चालणार नसल्याचे आमच्या लक्षात आले. त्यामुळे नियम पाळणाऱ्या नागरिकांची जर चांगल्याप्रकारे दखल घेतली तर लोकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण होण्यास मदत होईल. त्यामुळे हा उपक्रम राबविण्याचे ठरवले असल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांनीही पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले. याविषयी बोलताना ओंकार दळवी हा वाहनचालक म्हणाला, पोलिसांचा हा उपक्रम खरच स्तुत्य आहे. वाहतुक पोलिसांनी आज मला एका सिग्नलवरून जात असताना थांबण्यास सांगितले. मी हेल्मेट घातले होते तरीही का थांबवले असा विचार करत मी गाडी बाजूला घेतली. त्यांच्याजवळ असलेल्या मशीनवर त्यांनी माझ्या गादीवर काही दंड आहे का चेक केले. परंतु दंड नसल्याचे समजताच त्यांनी मला गिफ्ट व्हाऊचर दिले. पावती फाडण्याऐवजी जर पोलिसांकडून गिफ्ट व्हाऊचर मिळाल्यामुळे आनंद झाला.

Last Updated : Jun 14, 2019, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details