पुणे - ज्ञानवापीप्रमाणे पुण्यात देखील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर या दोन मंदिराच्या जागी दर्गा बांधण्यात आल्या आहेत. काशीतील ज्ञानवापी मशिदीच्याप्रमाणे पुण्यातील या दोन मंदिरांच्या जागेवर छोटा शेख व बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले आहेत. या दर्ग्याच्या ठिकाणी असलेल्या मूळ मंदीरांच्या मुक्तीसाठी यापुढच्या काळात लढा उभा केला जाईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीसअजय शिंदे यांनी जाहीर केले होते. तेथून पुण्यात देखील ज्ञानवापी आहे की काय अशी चर्चा सुरू झाली. खरे म्हणजे या ठिकाणी कोणतेही मंदिर नसून या ठिकाणी पहिल्यापासूनच दर्गा असल्याचे मत इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी जाहीर केले.
नेमका 'या' दर्ग्याचा इतिहास काय ? -14 व्या शतकात अफगाणिस्तान येथील शेख सल्ला आणि काही काळानंतर दुसरे छोटे शेख सल्ला हे दोघे पुनवळीत (पुणे) आले. तेव्हा त्याच्या बरोबर सुफी संत मोहम्मद तुघलखा हे ही आले होते. आणि इथेच उपदेश करता करता आणि चिंतन करता करता त्यांचा या पुण्यातील कसबा पेठ परिसरात 1356 ते 1380 या काळात दोन्ही शेख सल्ला बांधवांचा निधन झाले. आणि त्यानंतर याच परिसरात दर्गा बांधण्यात आली.आणि तिथं त्यानंतर उरूस सुरू झाला.आणि हे उरूस 700 वर्षांपासून सुरू आहे, अशी माहिती यावेळी सोनवणी यांनी दिली.
पेशव्यांनी कधीच या दर्ग्याविषयी बोलले नाही -विशेष म्हणजे ही वास्तू म्हणजेच या दर्गा जिथे आहे, ती प्राचीन वास्तू आहे. आणि पुणे महापालिकेच्या माध्यमातून या वास्तूला हेरिटेजचा दर्जा देण्यात आला आहे. हे दोन्ही शेख सुफी जेव्हा पुण्यात आले, तेव्हा आणि त्यानंतर देखील पुण्यात निजामशाही, आदिलशाही आणि राजे म्हणजेच शाहजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, राजाराम महाराज, शाहू महाराज हे देखील पुण्यात आले. तसेच अनेक पेशवे या परिसरात देखील होऊन गेले. त्यांनी कधीही या दर्ग्याबाबत आवाज उठवला नाही, की इथे पूर्वी मंदिर होते, असे देखील यावेळी सोनवणी यांनी यावेळी सांगितले.
1768 मध्ये थोरले माधवराव पेशवे यांनी याच दर्ग्याला एक हजार रुपयांची देणगी दिली -तसेच 1768 मध्ये थोरले माधवराव पेशवे यांनी यात दर्ग्याला एक हजार रुपयांची देणगी दिली होती. जर तिथे मंदिर आहे असे संशय त्यांना आला असता तर त्यांनी ही देणगी देखील दिली नसती. का तर ते कट्टर वैदिक होते. त्यामुळे आज जे काही म्हटले जाते आहे की या ठिकाणी पूर्वी मंदिरे होती हे खोटे असून या ठिकाणी कधीच मंदिरे नव्हती. तिथे पहिल्या पासूनच दर्गा होती, असे देखील यावेळी सोनवणी यांनी सांगितले.