पुणे - शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. यासोबतच आपण लवकरच बरे होऊन पुन्हा जनतेच्या सेवेत असू, असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यामागे महाविकास आघाडीत वेगवेगळी मतं असण्याची शक्यता
"..लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल"... मुरलीधर मोहोळ यांचे ट्विट
कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी, 'माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील' असे म्हटले आहे.
पुणे शहराला सध्या कोरोनाचा विळखा बसला आहे. शहराला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणा झटून काम करत आहे. महापौर मुरलीधर मोहोळ हे स्वतः आघाडीवर राहुन काम करत होते. त्यांच्या कामाचे कौतुक पालकमंत्री अजित पवार यांनी देखील केले होते. मात्र, मोहोळ यांनाच कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनाला थोडा अधिक ताण सहन करावा लागणार आहे.