पुणे - नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी मंगळवारी ईडीने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची तब्बल दहा तास चौकशी केली आहे. आज पुन्हा राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. यांच्या निषेधार्थ आज पुण्यात काँग्रेस आक्रमक होत बालगंधर्व रंगमंदिराबाहेर टायर पेटवत आंदोलन केले आहे. ( Pune Congress Agitation against ED Rahul Gandhi Inquiry )
कॉंग्रेसचे आंदोलन - काही दिवसांपूर्वी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना समन्स जारी केला होता. १३ जून रोजी दिल्ली ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले होते. १३ जून आणि १४ जून रोजी चौकशी केल्यानंतर आज पुन्हा राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. याच्या निषेधार्थ आज काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे.
राहुल गांधी यांना बदनाम करण्याचे काम -आज देशातील लोकशाही नष्ट करण्याचा काम हे भाजप करत आहे. राहुल गांधी यांच्यावर विनाकारण ईडी चौकशी लावून ज्या नॅशनल हेराल्ड प्रकरणात काहीही घोटाळा झालेला नसताना ही राहुल गांधी यांना बदनाम करण्याचा काम हे भाजप सरकार करत आहे. देशात हिटलरशाही सुरू असून संविधान नष्ट करण्याचा काम हे मोदी सरकार करत असल्याची टीका यावेळी आंदोलकांनी केली आहे.