पुणे -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कलेची जाण आहे. कलाकारांची कदर आहे. त्यांच्याजवळ प्रचंड मोठा अनुभव आहे. त्यांनी कला, नाट्य क्षेत्रातील अनेकांना मदतीचा हात दिला असल्याचे मत अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी व्यक्त केले. प्रिया बेर्डे यांनी आज (मंगळवार) खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, लावणी नृत्यांगना शकुंतला नगरकर, लेखक दिग्दर्शक संजय डोळे, संगीतकार ओंकार केळकर, अभिनेते उमेश दामले, संग्राम सरदेशमुख, विनोदी अभिनेते आशुतोष वाडेकर यांच्यासह अनेक कलाकार, कीर्तनकार, आदींनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
खासदार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश हेही वाचा -मराठा आरक्षण; सुनावणी 'व्हर्च्युअली' न होता 'फिजिकली' घेण्यात यावी
पक्षप्रवेशानंतर माध्यमांसोबत बोलताना प्रिया बेर्डे यांनी, ज्येष्ठ कलाकारांच्या मानधनात कशी वाढ करता येईल त्या दृष्टीने काम करणार असल्याचे सांगितले. तसेच चित्रपट क्षेत्रात करणाऱ्या महिलांसाठी बचत गट सुरू करता येईल का, त्या दृष्टीने माझा प्रयत्न राहणार आहे. डेलीसोपमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना 90 दिवसांनी पगार मिळतो. हा कालावधी 30 दिवसांवर आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना राज्य शासनाच्या ज्या काही जाहिराती असतात, त्यात मराठी कलाकारांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात यावे, यासाठी आपण आगामी काळात काम करणार असल्याचेही बेर्डे यांनी सांगितले.
यावेळी बेर्डे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बऱ्याच दिवसांनी असा जाहीर कार्यक्रम झाला आहे. मागील तीन-चार महिन्यात आपल्यासमोर वेगवेगले आवाहन होते. त्यातील आजचा हा कार्यक्रम पाहून आनंद वाटला. प्रिया बेर्डे या सामाजिक कार्य डोळ्यासमोर ठेऊन पक्षात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांचे स्वागत आहे. आज त्यांनी ज्या काही मागण्या व्यक्त केल्या आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेल.