पुणे- शहरात उत्पादित होत असलेल्या कोव्हिशिल्ड लसीसाठी सिरम संस्थेचे सीईओ अदर पूनावाला यांच्याशी संपर्क तसेच पत्रव्यवहार सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारची परवानगी आम्ही घेऊ पण तुम्ही आम्हाला थेट 25 लाख लस द्या, अशी चर्चा सुरू असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. पुण्यात लसींचा तुटवडा होत असल्याने महापालिकेला योग्य नियोजन करता येत नाहीये. त्यामुळे महापालिकेने स्वतः लस खरेदी करण्याचे ठरवले आहे आणि त्याबाबत सिरम इन्स्टिट्यूटसोबत चर्चा देखील सुरू आहे.
पुणेकरांची गैरसोय -
पुणे शहरात 18 ते 44 वर्षांच्या आणि 45 वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हे लसीकरण केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून लसीचा हा पुरवठा अनियमित होत आहे. अशा परिस्थितीत आम्हाला योग्य नियोजन करणे अवघड जात आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. जो पर्यंत नियमित लसी मिळत नाही, तोपर्यंत अशीच परिस्थिती राहील, असेही यावेळी महापौर म्हणाले.