पुणे - लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी,तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी राज्य शासनाने धोरण निश्चित केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या परवानगीचे पत्र असेल तरच अडकलेल्या नागरिकांना स्थलांतर करण्याची परवानगी दिली जाईल. या वृत्तानंतर पुणे तहसीलदार कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात कामगार, विद्यार्थी व इतर नागरिकांनी गर्दी केली होती. तहसीलदार पुणे यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
सकाळपासून अर्ज भरण्यासाठी नागरिक तहसीलदार कार्यालयाबाहेर गर्दी करू लागले. वाढत असलेली गर्दी पाहता स्थानिक खडक पोलिसांकडून या नागरिकांची नोंदणी करण्यास सुरवात करण्यात आली.ज्याला जशी माहिती मिळत गेली तसतशी तहसीलदार कार्यालयाबाहेर गर्दी वाढत गेली.