पुणे -पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे राज्यासह परराज्यातून हजारो कामगार शहरात कामासाठी आलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन आहे. यामुळे इतर राज्यात किंवा इतर जिल्ह्यात जाता येत नाही. लॉकडाऊन वाढण्याच्या भीतीमुळे शेकडो कामगार हिंजवडीमध्ये रस्त्यावर उतरले होते. अचानक झालेल्या या गोंधळामुळे हिंजवडी पोलिसांची धावपळ झाली होती.
हिंजवडीमध्ये लॉकडाऊन वाढण्याच्या भीतीने शेकडो कामगार रस्त्यावर?
हिंडवडीतील मान परिसरात परराज्यातील शेकडो कामगार रस्त्यावर उतरल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी त्यांना समजावून माघारी पाठवले आहे. सोशल डिस्टन्सिंगचा भंग केल्याने त्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.
हिंजवडी परिसरातील मानमध्ये परराज्यातील शेकडो कामगार रस्त्यावर उतरले होते. घोषणाबाजी करत मानमधून हिंजवडीच्या दिशेने हे सर्व जात होते. मात्र, यावेळी या कामगारांनी सोशल डिस्टन्सिंगची ऐसी तैशी केल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, कामगारांना नोटीस बजवण्यात आली आहे, अशी माहिती हिंजवडी पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड यांनी दिली आहे.
दरम्यान, अचानक रस्त्यावर आलेले कामगार हे लॉकडाऊन वाढेल या भीतीने रस्त्यावर आल्याचे बोलले जाते आहे. परंतु, अस काही नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सर्व कामगारांची समजूत काढून त्यांना पुन्हा आपापल्या घरात पाठवले आहे. मात्र, शेकडो कामगारांमुळे अनेकांचा जीव धोक्यात येऊ शकतो हे माहिती असून ही अनेक जण रस्त्यावर उतरले आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा भंग केल्याने त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.