पुणे- पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आज(बुधवारी)सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित व्यक्ती यामध्ये एक गंभीर जखमी झाली आहे. त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या व्यक्तीने आत्मदहन करण्याचा प्रयत्नामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
सुरेश विठ्ठल पिंगळे (वय 34) असे आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात या प्रकरणी घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एकजण पोलीस आयुक्त कार्यालयात काही कामानिमित्त आला होता. काही वेळातच त्याने स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतले. त्यानंतर पेटलेल्या अवस्थेतच ते आयुक्तालयाच्या गेटमधून आत शिरले.
दरम्यान पेटलेल्या अवस्थेत ते आतमध्ये शिरल्याने एकच गोंधळ उडाला होता. पोलीस आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आग विझवली. यामध्ये सुरेश पिंगळे हे गंभीररीत्या भाजले आहेत. त्यांना तातडीने पोलीस व्हॅनमधूनच ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान थेट पोलीस आयुक्त कार्यालयातच असा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले. परंतु हा नेमका प्रकार कशामुळे घडला, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. बंडगार्डन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.