पुणे -कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. केवळ किराणा आणि मेडिकलसारखे जीवनावश्यक दुकाने सुरू आहेत. पुणे शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे. त्यामुळे या ठिकाणी एकीकडे लॉकडाऊनची कडक अंमलबाजवणी होत असताना कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. कोरोनाशी मुकाबला करत असताना निर्जंतुकी करणासाठी लागणारी औषधे, कोरोना रोखण्यासाठी लागणारी औषधे, वैद्यकीय उपकरणे यांचा दवाखान्यांना, आरोग्य यंत्रणांना, सुरक्षा यंत्रणांना, स्वछता यंत्रणांना तसेच अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या इतर यंत्रणांना सुरळीत पुरवठा करण्याची जबाबदारी मेडिकल दुकानावर आहे. त्याचसोबत नागरिकांना लागणारी औषधे पुरवण्यासाठी पुण्यातील मेडिकल सज्ज आहेत.
पुणे जिल्ह्यात साधारण 9 हजारांच्यावर मेडिकल दुकाने आहेत. शहराचा विचार केला तर पुणे शहरात साधारण 4 हजारांच्यावर मेडिकल दुकाने आहेत. सध्याच्या घडीला या मेडिकल दुकानात औषधांचा स्टॉक उपलब्ध आहे. मात्र, आता हा स्टॉक कमी होऊ लागला असल्याचे मेडिकल दुकान चालकांकडून सांगण्यात आले आहे.