पुणे-उत्तर प्रदेश पोलीस कायदा हातात घेऊन किती टोकाचे वागतात, हे हाथरसच्या घटनेच्या निमित्ताने समोर आले. उत्तर प्रदेश सरकारची भूमिका घृणास्पद आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली. ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते.
पुण्याजवळील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये साखर उद्योगांसमोरील आव्हानांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर शरद पवार यांनी उत्तर प्रदेश सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, की हाथरसमध्ये त्या मुलीची हत्या झाली हे निश्चित आहे. तिचा मृतदेह कुटुंबियांच्या हातात न देता अंत्यसंस्कार केले. ही गोष्ट देशात पूर्वी कधी पाहिली नव्हती. या प्रकरणाबाबत देशभरात उमटलेली प्रतिक्रिया स्वाभाविक आहे. हाथरस येथे राहुल गांधींना अटकाव करायला नको होता. ते एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांना त्याठिकाणी जाऊ द्यायला हवे होते. राहुल गांधी हे भेटायला जात असताना त्यांच्यावर कारवाई झाली. हे पाहता कायद्याच्या राज्यावर तुमचा विश्वास नाही, असेच दिसत असल्याची टीका शरद पवारांनी भाजपवर केली.
'हाथरसच्या घटनेत उत्तर प्रदेश सरकारची भूमिका घृणास्पद' - मराठा आरक्षण न्यूज
हाथरसमध्ये त्या मुलीची हत्या झाली हे निश्चित आहे. तिचा मृतदेह कुटुंबियांच्या हातात न देता अंत्यसंस्कार केले. ही गोष्ट देशात पूर्वी कधी पाहिली नव्हती, शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवारांचा पार्थ पवारांना टोला...
पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे ट्विट केले होते. त्यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया विचारली असता शरद पवार म्हणाले, की राज्य सरकार न्यायालयात गेले आहे. आणखी कुणी जात असेल तर 10 जणांनी न्यायालयात जावे, अशी उपरोधिक प्रतिक्रिया त्यांनी दिली. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठावी हिच सरकारची आणि राष्ट्रवादीची भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती उठविणे हे गरजेचे आहे. घटना पीठाकडे सुनावणी जावी, यासाठी सरकार आग्रही आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.
सिरम इन्स्टिट्यूट भेटीचे सांगितले कारण-
पुढे शरद पवार म्हणाले, की सिरम इन्स्टीट्युटमध्ये जाऊन प्रतिकारशक्ती वाढविण्याचे इंजेक्शन घेतले. माझ्यासोबत माझ्या स्टाफनेदेखील इंजेक्शन घेतले. मात्र मी कोरोनाची लस घेतली, असे माध्यमे माझ्याबाबत काहीही पसरवतात. पण ही कोरोनाची लस नाही. तर प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीचे इंजेक्शन आहे. लसीची प्रगती कुठपर्यंत पोहोचली आहे, हे समजून घेण्यासाठी सिरमला गेलो होतो, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.