पुणे-महाविकास आघाडीच्या एक वर्षाच्या कामावर जनतेकडून शिक्कामोर्तब केले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानपरिषदेच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या एक वर्षातील कामगिरीमुळे महाविकास आघाडीचा विजय झाल्याचे पवार म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, की नागपूरच्या जागेवर गेली अनेक वर्षे आम्हाला कधीच यश मिळाले नव्हते. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही जागा अनेक वर्षे होती. तरीसुद्धा काँग्रेसला यश मिळते. हे महाविकास आघाडीचे यश आहे. यापूर्वीच्या लोकांना आजपर्यंत जनतेने स्वीकारले होते. त्यापेक्षा वेगळा निर्णय लोकांनी घेतला. हा त्याचा परिणाम असल्याचेही पवार म्हणाले. पुणे पदवीधर मतदारसंघाचा निकाल पाहता महाराष्ट्राचे चित्र बदलते आहे. या बदलाला महाराष्ट्राच्या जनतेचा पाठिंबा आहे. सर्व विजयी उमेदवारांचे मी मनापासून अभिनंदन करतो, असे पवार यावेळी म्हणाले.
हेही वाचा-आघाडी सरकारचा पुढील प्रवासही स्मूथ आणि ब्रेक न लावता होणार - आदित्य ठाकरे
चंद्रकांत पाटील यांचा विनोदी विधान करण्याचा लौकिक; शरद पवारांची खरमरीत टीका
एकटे एकटे लढले असते तर चित्र वेगळे असते, अशी प्रतिक्रिया निवडणूक निकालावर चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यावर बोलताना शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर खरमरीत टीका केली. ते म्हणाले, की विनोदी विधान करण्याचा चंद्रकांत पाटील यांचा लौकिक आहे. ते मागच्या वेळी विधानपरिषदेला कसे निवडून आले हे त्यांना माहीत आहे. तेव्हा आमचे एकापेक्षा जास्त उमेदवार होते. त्यामुळे ते निवडून आले. त्याचा त्यांना अंदाज होता, त्यामुळे विधानसभेच्या वेळी त्यांनी पुण्यातील सोयीचा मतदारसंघ निवडला. त्यांना जर विश्वास असता तर त्यांनी मतदारसंघ बदलला नसता. त्यामुळे त्यांनी एखादे विधान केले असेल तर त्याकडे गांभीर्याने पहायची गरज नाही, असे पवार म्हणाले.