पुणे- अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी तसेच त्यांच्या बहिणीच्या घरी आयकर विभागाच्यावतीने दुसऱ्या दिवशी देखील चौकशी सुरू आहे. पाहुणे वेगवेगळ्या घरी आहेत. त्यांचे काम सुरू आहे. त्यांचे काम झाल्यावर मी प्रतिक्रिया देईल. आयकर विभागाच्या वतीने अजूनही चौकशी सुरू आहे. ती चौकशी पूर्ण झाल्यावर मी माझी भूमिका मांडणार आहे. नियमाने जे काही असेल ते जनतेच्या समोर येईल त्यात घाबरायचं काहीही कारण नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज एका माध्यमाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
घाबरायचे काहीही कारण नाही - अजित पवार अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून कारवाई केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. फक्त जरंडेश्वरच नाही तर दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याचे कळत आहे. हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे आहे. त्याच बरोबर अजित पवार यांच्या तिन्ही बहिणीच्या घरी देखील आयकर विभागाच्यावतीने चौकशी करण्यात आली आहे.त्याच बरोबर त्याचे पुत्र पार्थ पवार यांच्य ऑफिस वर देखील चौकशी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोल्हापुरातील बहिण विजया मोहन पाटील यांच्या घर आणि कार्यालयावर गुरुवारी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. सकाळी 9 वाजता राजारामपुरी परिसरात असणारे मुक्ता पब्लिशिंग हाऊस प्रायव्हेट लिमिटेड या ऑफिसवर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्याने छापे टाकले. या कारवाईत चार अधिकाऱ्यांचा समावेश होता.
या कारवाईवर काय म्हणाले शरद पवार -
उत्तरप्रदेशात शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्यात आले. त्याची तुलना मी जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्याचा संताप किंवा राग सत्ताधाऱ्यांना आला असावा, आजची कारवाई ही त्यावरील प्रतिक्रिया असावी, अशी शक्यता नाकारता येत नाही. यंत्रणांना चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतू अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी छापे टाकणे हा अधिकाराचा अतिरेक आहे. अधिकाराचा असा गैरवापर किती दिवस सहन करायचा, याचा आता लोकांनीच विचार केला पाहिजे.
दरम्यान या सगळ्या कारवाई प्रकरणी अजित पवार यांनी आयकर विभागाची संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यावर माझी भूमिका मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा- हा तर अधिकाराचा अतिरेक, आयकर विभागाच्या धाडीवर शरद पवारांची टीका
हेही वाचा - कोल्हापुरातील अजित पवारांच्या बहिणीच्या घरासह कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे छापे