पुणे - शरद पवारांनी ऊस उत्पादकांचे प्रश्न सोडवले नाही आणि स्वतःच्याच कारखान्यांची दुकानदारी चालवली, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मात्र, हा धादांत खोटा आरोप आहे. पंतप्रधानांनी असे बोलणे बरोबर नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. नितीन गडकरी, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांचेही खासगी कारखाने आहेत. मग पंतप्रधानांना फक्त बारामतीचाच खासगी कारखाना दिसतो का, असा सवालही पवार यांनी यावेळी केला.
'पंतप्रधान मोदींना फक्त बारामतीचाच खासगी साखर कारखाना दिसतो का ?' - पंकजा मुंडे
शरद पवारांनी ऊस उत्पादकांचे प्रश्न सोडवले नाही असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता. त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी मोदी हे खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे.
बारामतीतील माळेगावातील प्रचार सभेत बुधवारी अजित पवार बोलत होते. सोलापूरमध्ये झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्यामुळेच साखर कारखानदारी अडचणीत आली. तसेच माढा आणि सोलापूर परिसरात दुष्काळाची परिस्थितीचे निराकरण करण्यात पवारांना अपयश आल्याची टीका मोदींनी केली. याला उत्तर देताना अजित पवार यांनी पंतप्रधान जे बोलतात ते बरोबर नाही, ते खोटे आरोप करत आहेत.
माढ्यात दुष्काळी परिस्थिती दूर करण्यात यश आल्याचे पंतप्रधान सांगत आहेत. मात्र याच भागात माढा सहकारी साखर कारखाना हा ऊस गाळप करतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उसाचे उत्पादन होते ते पाणी आले म्हणूनच ना, असेही अजित पवार यावेळी म्हणाले. राज्यात आघाडीचे सरकार असताना नवीन सहकारी साखर कारखान्यांना परवानगी न देण्याचे धोरण तसेच खासगी कारखान्यांना परवानगी न देण्याचे धोरण स्वीकारले होते. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या उसाचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर ज्यांच्यात ताकद आहे, त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र करुन खासगी साखर कारखाने काढावेत, असे सांगण्यात आले होते. आता तर परिस्थिती बघितली तर भाजपमधील अनेक नेत्यांचे खासगी साखर कारखाने आहेत. मोदी आता जातीवर भावनिक आवाहन करत आहेत, असेही पवार यावेळी म्हणाले.