महाराष्ट्र

maharashtra

शिवसेना पैसे घेवून मंत्री, आमदार बनवते; नारायण राणेंचा गंभीर आरोप

By

Published : Sep 22, 2019, 9:27 AM IST

शिवसेनेत पैसे घेऊन मंत्री, आमदार आणि महापौर केले जाते. त्याचबरोबर मनपातून काही टक्के हिस्सा घेतला जात असल्याने सेना कमजोर झाल्याचा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे. शिवाय सेनेत आता वाघ राहिले नसून त्यात शेळ्या-मेंढ्या असल्याचे म्हणत राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले.

नारायण राणे

पुणे- माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे. शिवसेनेने तानाजी सावंत यांना पैसे घेऊन मंत्रीपद दिले आहेत. सावंत यांनी किती पैसे दिलेत हेही जगजाहीर झाले आहे. शिवसेनेत पैसे घेऊन मंत्री, आमदार आणि महापौर केले जाते. त्याचबरोबर मनपातून काही टक्के हिस्सा घेतला जात असल्याने सेना कमजोर झाल्याचा गंभीर आरोप राणे यांनी केला आहे. शिवाय बाळासाहेबांची शिवसेना राहिले नसून सेनेला शेळी किंवा मांजर म्हटले तरी हरकत नाही. आता सेनेत वाघ राहिले नसून त्यात शेळ्या-मेंढ्या असल्याचे म्हणत राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच माझ्या भाजप प्रवेशाला सेनाच आडकाठी करत आहे. मला मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून बोलल्यानंतर मी गेलो. या सर्वांनी माझ्या नेतृत्वात काम केले आहे. मी भाजपमध्ये जाणार हेही स्पष्ट आहे. उद्धव ठाकरे सोडले तर सर्वच राजकीय पक्षात माझे चांगले संबंध असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलमधील युवर्स ट्रुली या कार्यक्रमात नारायण राणे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, काँग्रेसच्या पराभवाला काँग्रेसच जबाबदार आहे. सर्वसामान्यांचा संपर्क तुटला आणि भ्रष्टाचार वाढून फक्त पैशाने काम करण्याची सवय लागल्याने काँग्रेसची अधोगती झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्यासमोर राहुल गांधीं प्रभावहीन झाल्याचेही ते म्हणाले. नारायण राणे पुढे म्हणाले की, शिवसेना भुजबळांना पक्षात घ्यायला तयार आहेत. शिवसेनेला प्रदीप शर्मा, भुजबळ चालते. फक्त नारायण राणे चालत नाही. शिवसेनेला राणेंची फार भीती वाटते. मात्र, मलाच सेनेत जायचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझ्या भाजप प्रवेशात शिवसेना आडकाठी आणत आहे. मला मंत्रीपदही मिळणार होते, शपथ घ्यायचा दिवस ठरला होता. मात्र शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिल्याने ते बारगळण्याचा आरोप राणे यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details