पुणे - महानगरपालिकेच्या आगामी महापौर पदाच्या उमेदवारीसाठी भाजपच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. महापालिकेतील सध्याचे संख्याबळ पाहता महापौर भाजपचाच होणार हे जवळपास निश्चित असल्याने मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
महानगरपालिकेच्या आगामी महापौर पदाच्या उमेदवारीसाठी भाजपच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांचे नाव जाहीर करण्यात आले भाजपकडून महापौर पदासाठी अनेकजण इच्छुक होते. त्यामुळे भाजपकडून नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार का, याबाबत उत्सुकता असतानाच मुरलीधर मोहोळ यांचे नाव जाहीर झाल्याने अन्य नेत्यांच्या आशा मावळल्या आहेत.
मुरलीधर मोहोळ यांनी यापूर्वी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. तसेच नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोथरूड विधानसभा मतदारसंघात मोहोळ हे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मैदानात दंड थोपटून उतरले होते. याचेच बक्षीस मिळाल्याची चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे.
मोहोळ हे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांनी स्वत: कोथरूडमधून आमदारकी लढवण्यासाठी तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांना त्याग करावा लागला.
सध्या महापालिकेत भाजपला संपूर्ण बहुमत असून, त्यांचे 97 नगरसेवक आहेत. तर, राष्ट्रवादीकडे 39 नगरसेवक आहेत. तसेच शिवसेना 10, काँग्रेस 9, मनसे 2 आणि इतर 5 नगरसेवक आहेत.
भाजपचा महापौर होणार हे निश्चित असतानाही काँग्रेस व राष्ट्रवादीने ही निवड एकतर्फी होऊ न देण्यासाठी आघाडीकडून राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रकाश कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.