पुणे- जानेवारी-फेब्रुवारी, २०२२ महिन्यात म्हाडाच्या विविध पदांची परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात पार पडली. या परीक्षा टीसीएस या खासगी कंपनीने घेतल्या आहेत. या कंपनीने स्वतःच्या आयओएन केंद्रा व्यतिरिक्त इतर खासगी कॉम्प्युटर सेंटर व महाविद्यालयात सेंटर दिले होते. मात्र, त्या ठिकाणी उमेदवारांच्या तपासणीची कोणतीही व्यवस्था नव्हती. यामुळे काही ठिकाणी परिक्षेत गैरप्रकार घडला आहे, असा आरोप एमपीएससी समन्वयक राहुल कवठेकर याने केला आहे.
याबाबतच त्यांनी पुणे सायबर पोलीस, म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडे पुराव्यानिशी तक्रार दिल्याचेही सांगितले आहे. औरंगाबादच्या एका केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजही दिले असून त्यात ५ फेब्रुवारी रोजी विद्यार्थी अनिल राठोड व सुपरवाइजर प्रवीण चव्हाण परीक्षा केंद्रात प्रवेश करताना दिसत आहेत. त्या दिवशी विद्यार्थ्यांची परीक्षा नसतानाही अनधिकृतरीत्या विद्यार्थ्याने प्रवेश केला आहे. परीक्षा केंद्राच्या आतमध्ये सुपरवायझर आणि विद्यार्थ्यांसोबत परीक्षा केंद्राचा मालक दिसून येत असून तिघे सीसीटीव्ही बंद करुन कॉम्प्युटरसोबत छेडछाड करताना दिसून येत आहेत. सीसीटीव्ही बंद केल्यानंतर त्यांनी सिस्टम सोबत छेडछाड करून सॉफ्टवेअर व त्यांना हवे ते बदल केल्याची शक्यता आहे. सुपरवाइजर प्रवीण चव्हाण व विद्यार्थी अनिल राठोड मित्र आहेत. तसेच औरंगाबाद टीव्ही सेंटर जवळील एका अभ्यासिकेत सोबत अभ्यासाला आहेत. या अभ्यासिकेचा मालक या स्कॅमचा मुख्य धागा असून त्याने त्याच्या या अभ्यासिकेतील 10 ते 12 विद्यार्थांना या परीक्षा केंद्रात अशा प्रकारे मदत केल्याची शक्यता कवठेकरने वर्तवली आहे.