पुणे - लॉकडाऊन काळात बंद असणाऱ्या दुकानाचे शटर उचकटून चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांना चतुःशृंगी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून चोरलेली पल्सर मोटर सायकल आणि 60 हजाराची रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विकास उर्फ जंगल्या उर्फ विकी दिलीप कांबळे (वय 28) आणि सरफराज उर्फ रावण ताज शेख अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसात चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. चोरटे तोंडावर मास्क घालून, रेनकोट टोपी परिधान करून आपली ओळख लपून हे गुन्हे करत होते. त्यामुळे या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. दरम्यान चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील अधिकाऱ्यांना घरफोडीच्या गुन्ह्यात वरील आरोपींचा सहभाग असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर चतु:र्श्रुंगी पोलीस ठाण्याचा तपास पथकातील अधिकारी मोहन जाधव आणि त्यांच्या टीमने या आरोपींचा शोध घेत पिंपरी-चिंचवड परिसरातील चिखली येथे पाठलाग करून पकडले.