पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या महत्वाच्या फाईलमध्ये परस्पर फेरफार केल्याचं प्रकरण समोर आले असून आदेशच फिरवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अधिकाऱ्यांवर वचक राहिला नसल्याचा आरोप करत ज्याने कोणी हे केलं आहे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पडळकर यांनी केली आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
नेमकं प्रकरण काय आहे -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या एका महत्त्वाच्या फाईलमध्ये परस्पर फेरफार करत आदेशच फिरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी एका अभियंत्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. या फाईलमधील मजकूर मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर बदलण्यात आला. ही बाब समोर आल्यानंतर मंत्रालयात खळबळ उडाली असून याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सरकारमध्ये कोणीही ऐकत नाही - पडळकर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या महत्वाच्या फाईलमध्ये परस्पर फेरफार केल्याचं प्रकरण समोर आले असून आदेशच फिरवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्र्यांची सरकारमध्ये कोणी ऐकत नसल्याचा हा पुरावा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी पडळकर यांनी केली आहे.
अन् त्यामुळे सत्तेत रस नाही- पडळकर
भाजपाला लोकांचे काम करण्यासाठी सत्ता हवी असते. आज विश्वासघाताने विरोधात आहोत. याचा आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही जनतेचे प्रश्न सरकारकडे मांडत आहोत, त्यांच्या मानगुटीवर बसून राज्याचे विरोधी पक्षनेते काम करून घेत आहेत. कोरोना, चक्रीवादळ, विदर्भातील महापूर, अतिवृष्टी, या सगळ्या विषयामध्ये विरोधी पक्षच लोकांमध्ये गेला. लोकांमध्ये जाणं त्यांना विश्वास देणे. त्यांना मदत देणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र, ते उशिरा गेले. विरोधी पक्ष पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या बांधावर गेला. लोकांनी बहुमत दिले असले तरी विश्वासघाताने सत्तेत नाहीत. आम्ही लोकांच्या बाजूने काम करतोयेत, त्यामुळे सत्तेत रस नाही.