पुणे - मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. आम्ही सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. मात्र, काही जण ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी करत आहेत. पाठिंबा असून ही या विषयाची दिशा या दिशेने सरकत असेल तर त्या विरोधात लढण्यासाठी आम्हाला पुन्हा एकत्र यावे लागेल, असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने देण्यात येणार्या महात्मा फुले समता पुरस्कार ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. महात्मा फुले यांच्या 125 व्या पुण्यतिथीनिमित्त समता भूमी महात्मा फुले स्मारक येथे झालेल्या कार्यक्रमात यावेळी ज्येष्ठ विचारवंत हरी नरके, परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नलावडे, राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकशाहीत डोक्यांना किंमत - भुजबळ
लोकशाहीत किती डोकी विचारांच्या मागणीच्या पाठीमागे आहेत हे पाहिले जाते. ओबीसी समाज 54 टक्के आहे. त्यामुळे त्यांचे आरक्षण अबाधित राहिले पाहिजे हीच आमची भूमिका आहे. आधी आघाडी सरकारने नंतर फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाला आम्ही पाठिंबा दिला आहे. पाठिंबा नसताना हा विषय वेगळ्या दिशेने जाऊ नये यासाठी आपण जागरूक राहिले पाहिजे. धर्माधर्मात आणि जाती-जातीत भांडणे वाढत आहेत. ती मिटवण्यासाठी समता सैनिक कायम राहिला पाहिजे, असे सांगून ओबीसी समाजासाठी असलेल्या विविध मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.