पुणे - राज्यात शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) नेत्यांमध्ये गेल्या काही वर्षंपासून जोरदार टीका आणि आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असते तर हे सरकार बनले नसते. बाळासाहेबांनी अशा खुर्चीला लाथ घातली असती, असा दावा भाजप नेत्यांकडून केला जातो. त्यावर आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा दावा केला. हे सरकार बाळासाहेबांच्या स्वप्नातील सरकार आहे. ही बाळासाहेबांचीच भूमिका होती, असे यावेळी संजय राऊत म्हणाले. त्याला शरद पवार (Sharad Pawar) यांनी दुजोरा दिला आहे.
पुण्यात महाराष्ट्र कनेक्ट काँक्लेव्ह अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची ज्ञानेश महाराव यांनी मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कन्हैया कुमार, मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित होते.
सरकार व्यवस्थित सुरू आहे - या मुलाखतीच्या सुरुवातीलाच पवार यांना महाविकास आघाडीबद्दल विचारण्यात आले तेव्हा पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार लोकांच्या प्रश्नासाठी एकत्र आले आहे आणि आता महाविकास आघाडी सरकारचे काम हे व्यवस्थित सुरू आहे, असे देखील या वेळी पवार म्हणाले.
ब्रिजनभूषण मॅनेज होणारा नाही- राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱयाला विरोध करणारे ब्रिजभूषण सिंह यांना तुम्ही मॅनेज केले असा प्रश्न पवार यांना विचारला असता ते म्हणाले की, ब्रिजभूषण सिंह यांना कुणी मॅनेज करु शकेल अशी व्यक्ती नाही. कुस्तीच्या क्षेत्रात आम्ही एकत्र काम करतो, पण प्रत्येकाची मतं वेगळी आहेत. त्यांना मॅनेज करण्यात आले हे डोक्यातून काढून टाका, ते मॅनेज होणाऱ्यांपैकी नाही, असे देखील यावेळी पवार म्हणाले.
हेही वाचा -OBC Reservation Issue : एकदाची जातनिहाय जनगणना कराच; शरद पवारांचे केंद्र सरकारला आव्हान
सामर्थ जर कोणामध्ये असेल तर ते शरद पवार यांच्यात - शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुमचा अडीच वर्षांचा जो आग्रह होता तो जर भाजपाने मान्य केला असता, तर अडीच वर्ष संपली असती. आता तुमची पुढील अडीच वर्षे सुरू झाली आहेत, असा कसे वाटत आहे? यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, अडीच वर्षांपूर्वी साधारण आमची जी देवाणघेवाण सुरू होती, तेव्हाच माझ्या डोक्यात सुरू होते की हे काही शब्दाला जागणारे लोक नाहीत. मी शरद पवारांशी नेहमी संपर्कात असतो, त्यांना म्हणालो की काहीतरी बदल महाराष्ट्रात व्हायला हवा. महाराष्ट्रात बदल करण्याचे सामर्थ जर कोणामध्ये असेल तर ते शरद पवार यांच्यात आहे. या गोष्टी निकालाच्या अगोदरच्या मी सांगतोय, याचा अर्थ भाजपाला आम्ही फसवायला निघालो होतो असे नाही. परंतु, त्यांची जी वृत्ती होती, याचा मी एक फार मोठा अभ्यासक आहे. त्यामुळे मला माहीत आहे की हे काय करू शकतात, हे काय करणार हे मी आताही सांगू शकतो. दिलेला शब्द पाळला नाही म्हणून शिवसेना देखील या महाराष्ट्रात एक वेगळी भूमिका घेऊ शकते आणि शिवसेनेसोबत इतर प्रमुख पक्ष येऊन या राज्याला एक वेगळी दिशा आणि नेतृत्व देऊ शकतात, हे जेव्हा दाखवण्याची संधी आली, तेव्हा मला असे वाटते की सगळ्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला, असे देखील यावेळी संजय राऊत म्हणाले.
देशामध्ये देखील बदल घडवण्याची ताकद आपल्या राज्यात -मला अजूनही खात्री वाटते की महाराष्ट्रातील हा प्रयोग हा असाच सुरु राहीला, तर देशामध्ये देखील बदल घडवण्याची ताकद आपल्या राज्यात आहे. मागील अडीच वर्षांत महाराष्ट्रात अनेक राजकीय संकटं विविध माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. पण कोणी वाकलं किंवा झुकलं नाही. आपण लढतो आहोत, हा लढणारा महाराष्ट्र आहे. त्यामुळे पुढील अडीच वर्षे देखील सुखरुप पार पडतील आणि त्या नंतरच्या निवडणुकांमध्ये देखील भाजपाने विरोधी पक्षात बसण्याची मानसिक तयारी ठेवावी, हे मी खात्रीने सांगतो. असंही संजय राऊत यांनी यावेळी बोलून दाखवलं.