कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन हाच पर्याय; आयएमएचे माजी अध्यक्ष अविनाश भोंडवेंचे मत
कोरोना रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाऊन हाच शेवटचा उपाय असून शासनाने योग्य नियोजन करूनच लॉकडाऊन करावा असं मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केलं आहे.
पुणे : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागणार की काय? अशी चर्चा होत आहे. कोरोना रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाऊन हाच शेवटचा उपाय असून शासनाने योग्य नियोजन करूनच लॉकडाऊन करावा असं मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केलं आहे.
अजून महिनाभर रुग्णवाढ होईल
राज्यासह पुणे शहरात गेल्या महिन्याभरापासून मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. पहिल्या लाटेपेक्षा आत्ताची लाट ही अधिक घातक असून नोव्हेंबरमध्ये ब्रिटेनमध्ये तयार झालेल्या नवीन विषाणूप्रमाणे महाराष्ट्रातही विषाणूचे म्युटेशन झाले आहे. त्यामुळे पूढील महिनाभर तरी कोरोना रुग्णवाढीचा आलेख चढता असेल. साधारणपणे एप्रिल अखेर किंवा मे महिन्याच्या मध्यापर्यंत रुग्णवाढीचा आलेख चढता असेल असे भोंडवे यांनी म्हटले आहे.
लॉकडाऊनचे नियोजन करावे
सध्या लॉकडाऊन म्हटलं की लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीती निर्माण होते. त्यामुळे आधीच्या लॉकडाऊनमध्ये झालेल्या चुकांची पुनरावृत्ती केली जाऊ नये असेही भोंडवेंनी म्हटले आहे. योग्य नियोजन करून लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहिल याची काळजी घेतली जावी असे ते म्हणाले.