पुणे -शहरातील अनेक वाईन शॉपसमोर मद्य विकत घेण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. काही व्यक्ती तर पहाटे सहा वाजल्यापासून रांगेत येऊन थांबले. परंतु बारा वाजले तरीही दुकाने उघडली नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला. काही संतप्त मद्य प्रेमींनी तर 'आम्ही काय आता कायमची दारू बंद करायची का ?' असा उद्विग्न सवाल सरकारला केला आहे.
लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. या टप्प्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी असलेल्या क्षेत्रातील जीवनावश्यक वस्तूंखेरीज इतरही दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच कंटेनमेंट भाग वगळता रेड झोनसह सशर्त दारू विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.
दारूची दुकाने न उघडल्याने पुण्यात मद्य ग्राहक संतप्त... हेही वाचा...पहिला लाभार्थी 'मीच', मद्य मिळवण्यासाठी तळीरामांमध्ये चढाओढ.. मद्यविक्री दुकानांसमोर रांगा
पुण्यातील काही भाग वगळता इतर भागांमध्ये संचारबंदी आणि लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. सकाळी 10 ते 6 या वेळेत अत्यावश्यक सेवेखेरीज इतरही दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने यासंदर्भात आदेशही काढले आहेत. त्यामुळे आज सकाळपासूनच वाईन शॉपसमोर गर्दी आहे. पुण्यातील भांडारकर रस्ता, लाँ कॉलेज रस्ता, सिंहगड रस्ता या परिसरातील वाईन शॉपसमोर सकाळपासूनच गर्दी आहे.
वाईन शॉप मालकांनी मात्र आम्हाला दुकान उघडण्याचे आदेश नाहीत, असे सांगून दुकान उघडणार नसल्याचे सांगितले. तरिही गर्दी कमी होत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत ही गर्दी पांगवली. सिंहगड रस्त्यावरील जेम्स वाईन्स शॉप समोरील गर्दी हटवण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. अखेर दुकान उघडले नसल्यामुळे तळीरामांचा हिरमोड झाला. काहींनी तर बोलताना दीड महिना झाला दारू प्यायली नाही, असे सांगितले. आम्ही घरात बसून तरी काय करणार. त्यापेक्षा सरकारने दारूची दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.