पुणे- छत्तीसगड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांची एक यादी जाहीर केली. त्या यादीतील संतोष शेलार हा पुण्याच्या एका झोपडपट्टीतून २०१० साली बेपत्ता होता. तो सध्या छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा कमांडर म्हणून कार्यरत असल्याचे छत्तीसगड पोलिसांनी जाहीर केलेल्या यादीत म्हटले आहे. त्याची ही माहिती समोर आल्यानंतर आमच्या प्रतिनिधीने त्याच्या घरी जाऊन कुटुंबीयांची विचारपूस केली.
संतोष शेलार याच्या कुटुंबियांशी संवाद साधताना त्याच्या घरी आम्हाला संतोषचा भाऊ संदीप शेलार भेटला. त्याच्याशी संवाद साधल्यानंतर अशी माहिती मिळाली, मनमिळावू असणारा संतोष चांगला चित्रकार होता. ७ नोव्हेंबर, २०१० रोजी मुंबईतील एका चित्रप्रदर्शनात दोन महिन्यासाठी काम मिळाल्याचे सांगून तो घराबाहेर पडला. त्यानंतर तो परत आलाच नाही. त्यानंतर संदीप शेलार यांनी १० जानेवारी, २०११ रोजी खडक पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली होती.
संदीप शेलार यांनी सांगितले की, संतोष हा सचिन माळी, शीतल साठे, सागर गोरखे आणि रुपाली जाधव यांच्या संपर्कात होता. त्यांच्या कार्यक्रमासाठी, पथनाट्य सादर करण्यासाठी तो जात होता. तो बेपत्ता झाल्यानंतर नेमका कुठे गेला असावा याची माहिती शीतल साठे आणि सचिन माळी यांना होती म्हणून आम्ही त्यांना संतोष विषयी सतत विचारत होतो. त्यांनाही आम्हाला तेव्हा एका महिन्याचा आत तो परत येईल, असे सांगितले होते. परंतु, तुम्ही पोलिसात जाऊ नका असे सांगितले. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. परंतु, माझा भाऊ अजूनही परत आला नाही.
आता तो माओवाद्यांमध्ये भरती झाल्याच्या बातम्या येत आहेत, याविषयी विचारले असता शेलार म्हणाले, गेला तेव्हापासून त्याने एकदाही आमच्याशी संपर्क साधला नाही. तो माओवादी झाला यावरही आमचा विश्वास नाही. जर तो माओवादी झाला तर काहीतरी पुरावा असेल. तसा पुरावा आम्हाला दाखवा मगच आम्ही विश्वास ठेवू.