पुणे :आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील फरार असलेल्या किरण गोसावीला आज (सोमवारी) आणखी 1 दिवस पोलीस कोठडी देण्यात आली. पुणे प्रथम न्याय दंडाधिकाऱ्यांनी हा निर्णय सोमवारी दिला.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील किरण गोसावीची एक ऑडीयो क्लिप व्हायरल झाली आहे. व्हायरल झालेल्या ऑडियो क्लिपमध्ये किरण कोसावीने लखनऊ पोलिसांकडे सरेंडर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांचं पथक किरण गोसावीला अटक करण्यासाठी लखनऊला रवाना झालं आहे. मात्र, तो आपले ठिकाण बदलून पोलिसांना गुंगारा देत होता.
एका दिवसाची केली वाढ
किरण गोसावीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक करून कोर्टात हजर केले होते. यावेळी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून न्यायाधीश आर.के.बाफना भळगट यांनी सुरवातीला 8 दिवसांची नंतर 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची आज (सोमवारी) मुदत संपल्यावर गोसावीला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याच्या कोठडीत आणखी 1 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
तीन दिवसाची पोलिस कोठडीची मागणी
फिर्यादीचे वकील राहुल कुलकर्णी युक्तिवाद करताना म्हणाले की, आरोपी किरण गोसावी यांच्याकडून तीन लाखांपैकी 1 लाख मिळविण्यामध्ये यश आले आहे. तसेच त्याच्याकडे असलेल्या मोबाईलचा पासवर्ड मिळणे आवश्यक आहे. त्यातून आणखी माहिती पुढे येण्यास मदत होईल. तो काही काळ सचिन पाटील या नावानं फिरत होता. मात्र त्याचदरम्यान कुसुम गायकवाड महिलेच्या मदतीने आधार कार्ड बनविण्यात आले आहे. या प्रकरणात तिचाही समावेश आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाकरता तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळावी,अशी मागणी करीत होता.
गोसावी सहकार्य करीत नाही
आरोपी किरण गोसावी हा तपासात कोणत्याही प्रकाराच सहकार्य करीत नाही. यामुळे पोलिस कोठडी मिळावी,अशी मागणी फिर्यादीच्या वकिलाकडून करण्यात आली. त्यावर आरोपीचे सचिन कुंभार यांनी फिर्यादीच्या वकिलांचे आरोप खोडून करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेर न्यायाधीश आर.के.बाफना भळगट यांनी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.