पुणे - शहरातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आयटी अभियंता महिलेचे अपहरण करून तिच्याजवळचा अडीच लाख रुपयांचा ऐवज लुबाडण्यात आला. त्यानंतर तिला कारमध्येच बांधलेल्या अवस्थेत सोडून आरोपींनी पळ काढला. महिलेने कशीबशी आपली सुटका करून घेतात कोंढवा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींची नावेही निष्पन्न झाली आहेत.
श्रीदेवी जनार्धन नंदन (वय 36) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. ती बंगलोर मधील एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला असून पुण्यात सुट्टी निमित्त आई-वडिलांकडे आली होती. याप्रकरणी राजेश सिंग आणि त्याच्या साथीदारांवर अपहरण आणि लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आयटी इंजिनीअर महिलेचे अपहरण करून चाकूच्या धाकाने अडीच लाखांना लुटले, पुण्यातील घटना - आयटी इंजिनीअर महिलेचे अपहरण करून लाखोंना लुटले
शहरातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अभियंता महिलेचे अपहरण करून सोन्याच्या दागिन्यांसह अडीच लाखांचा ऐवज लुटल्याची घटना समोर आली आहे. फिर्यादी महिला बंगळुरूमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला असून दिवाळीच्या सुटीनिमित्त ती पुण्यात आई-वडिलांकडे आली होती.
आरोपी कुटुंबाच्या ओळखीचा -
आरोपी राजेश सिंग हा फिर्यादी महिलेच्या आई-वडिलांच्या ओळखीचा आहे. तो फिर्यादीला गाडी चालवण्याचे प्रशिक्षण देत होता. फिर्यादीचे आई-वडील बाहेरगावी गेल्याची संधी साधून तो एका मित्रासोबत मंगळवारी रात्री फिर्यादी यांच्या घरी आला. तसेच आज मी तुला फियाट कार शिकवतो असे म्हणून तिला बाहेर घेऊन गेला. त्यानंतर फिर्यादीने घरातील फियाट कार काढली आणि त्याच्यासोबत बाहेर गेली.
कटरने बोटातील अंगठी कापली -
त्यानंतर आरोपीने ही गाडी उंद्री येथील एका सुनसान गल्लीमध्ये उभी केली आणि चाकूचा धाक दाखवून तिच्याकडे पन्नास हजाराची मागणी केली. यावर फिर्यादीने मी पर्स आणली नसून घरी गेल्यावर पैसे देते असे सांगितले. त्यानंतर घराच्या दिशेने कार नेत असताना आरोपीने रस्त्यातच गाडी थांबवुन तिचे हात-पाय बांधले आणि तोंडात कापडाचा बोळा कोंबला. तिच्या एनआयबीएम येथील घरापर्यंत येईपर्यंत आरोपीने तिच्या गुगल पे मधून चाळीस हजार रुपये काढून घेतले. तिच्याकडून घराची चावी घेत घरातून तिची पर्स आणली आणि त्यातील एटीएम काढून घेत त्यातून दहा हजार रुपये देखील काढून घेतले. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने दुकानातून कटर विकत आणले आणि तिच्या तिच्या बोटातील अंगठ्या कटरच्या सहाय्याने कापून घेतल्या. त्यानंतर तिला गाडीतच बांधलेल्या अवस्थेत सोडून दोन्ही आरोपींनी पळ काढला.