बारामती -फुप्फुसात १०० टक्के संसर्ग झालेल्या कोरोनाबाधित गर्भवती महिलेवर यशस्वी उपचार करण्यात बारामती येथील मेहता रुग्णालयामधील डॉक्टरांना यश आले आहे. व्हेंटिलेटर वर असणाऱ्या या महिलेची सुखरूप प्रसूती झाली असून या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. कोरोनाबाधित झाल्याने या महिलेचा एचआरसीटी स्कोअर १०० टक्के म्हणजेच २५ होता. या गंभीर परिस्थितीतून डॉक्टरांनी तिला बाहेर काढत तिच्यासह बाळाला जीवदानच दिले आहे.
डॉक्टरांच्या ‘बारामती पॅटर्न’चे सर्वत्र होत आहे कौतुक -
शहरातील फिजिशियन डॉ. सुनील ढाके, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विशाल मेहता, डॉ. टेंगले, डॉ. अुनराधा भोसले, भूलतज्ज्ञ डॉ. सुजित अडसुळ, डॉ. निकिता मेहता, बालरोगतज्ज्ञ डॉ. अमित कोकरे, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. अमोल भगत, डॉ. हर्षा जाधव यांनी या महिलेवर यशस्वी उपचार केले आहेत. त्यासाठी केईएम रुग्णालयाचे डॉ विवेक जोशी, डॉ. हर्षवर्धन व्होरा, डॉ. शुभांगी वाघमोडे, डॉ. आनंद गवसणे यांचा सल्ला व मार्गदर्शन महत्त्वाचा ठरल्याचे डॉ. विशाल मेहता यांनी सांगितले.
गुंतागुंतीची शस्त्रक्रिया -
याबाबत डॉ. मेहता आणि डॉ ढाके यांनी सांगितले, की ६ एप्रिलला गर्भारपणाच्या ९ महिन्यांचा कालावधी पुर्ण झालेली २८ वर्षीय महिला रुग्ण रुग्णालयात दाखल झाली. ही महिला मूळची शेतकरी कुटुंबातील असून तिला ३ वर्षांची एक मुलगी आहे. तिचे संपुर्ण कुटुंब कोरोनाबाधित होते. या महिलेला देखील दाखल करताना कोविडमुळे ताप, खोकला, धाप लागणे असा त्रास होता. ऑक्सिजन पातळी ९० ते ९२ दरम्यान होती. दोन तीन दिवसांनी तिची ऑक्सिजन पातळी आणखी खालावली. कोविड मेडिकल मॅनेजमेंट नुसार तिच्यावर उपचार सुरू केले. या दरम्यान तिला ऑक्सिजनची गरज भासू लागली. १० एप्रिलला ही महिला अत्यवस्थ झाली. तिला व्हेंटिलेटरवर घेण्याची वेळ आली. महिलेचा एचआरसीटी स्कोअर २५ असल्याने अतिशय नाजूक अवस्था होती. रक्ताचे रिपोर्ट देखील चांगले नव्हते. त्यातच तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. मात्र, पहिले सिझर असल्याचे आता देखील सिझरच करणे गरजेचे होते. संध्याकाळी डॉक्टरांनी निर्णय घेत कोरोना संसर्गाचा धोका पत्करून गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली. यावेळी महिलेने एका सुदृढ बालिकेला जन्म दिला.
रुग्ण व्हेंटिलेटरवर असताना ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर बाळाला चिरायू हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. या बाळाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर ती महिला १३ दिवस व्हेंटिलेटरवर अतिदक्षता विभागात अत्यावस्थ होती. दरम्यान डॉक्टरांनी न हारता संपूर्ण मेडिकल मॅनेजमेंटचा वापर केला. हाय रीस्क घेत त्या रुग्णाला मोठ्या वैद्यकीय कौशल्याचा वापर करत धोकादायक स्थितीतुन बाहेर काढले.
४५ दिवसांच्या उपचारानंतर ती महिला कोरोनामुक्त -
योग्य वेळी योग्य निर्णय घेवुन आवश्यक उपचार करण्यात आले. २४ तास रुग्णाकडे सेवाभावी वृत्तीने स्टाफने लक्ष दिले. स्वच्छता, तत्पर सेवा असल्याचे रुग्णाला याचा फायदा झाला. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला कोणताही त्रास झाला नाही. या दरम्यान रुग्णाचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. रुग्ण व्हेंटिलेटरवर असताना तिच्या मांडीवर बाळ दिले. त्यामुळे रुग्णाची जगण्याची इच्छा प्रबळ झाल्याचे डॉ. विशाल मेहता यांनी सांगितले.
२५ स्कोअर असणाऱ्या गर्भवती महिलेने बाळाला सुखरूप जन्म दिला. ४५ दिवसांच्या उपचारानंतर ती महिला कोरोना मुक्त होवून प्रकृती चांगली झाली आहे. तिचे बाळ देखील सुखरूप आहे. रुग्णालयात सर्वच आजारातील अत्यवस्थ गर्भवतींच्या प्रसूतीसाठी ‘हाय रिस्क ऑबस्टेट्रिक युनिट’ उभारण्यात आले आहे. त्यामुळे कोविडसह कोणत्याही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, उपचार करण्याचे नियोजन रुग्णालयात आहे. कोरोनाबाधित महिला आणि तिच्या बाळाला चांगले उपचार देऊ शकल्याने त्यांच्या जीवावर बेतणारा धोका टळला याचे मनापासून समाधान आहे. रुग्णालय व्यवस्थापन, उपलब्ध आधुनिक उपचार यंत्रणेसह रुग्णांच्या नातेवाईकांचे सहकार्य मोलाचे ठरल्याचे डॉ. मेहता म्हणाले.