मुंबई - दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. नवरात्री आणि दसऱ्यात मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे व्यापाऱ्यांनाही पुन्हा उभे राहण्याचे बळ मिळाले आहे. एका सर्वेक्षणानुसार भारतीय दिवाळी शॉपिंगसाठी सर्वसाधारणपणे 21 हजार रुपये खर्च करण्याच्या तयारीत असतात. अशातच 28 ऑक्टोबर रोजी आलेला गुरुपुष्यामृत योग खरेदीसाठी हा खूप चांगला मुहूर्त आहे. गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरु पुष्यनक्षत्र योग. गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्ताने गुरुपुष्यामृत योगाचे महत्त्व (Importance Of Guru Pushya Yoga) आणि याचा बाजारात काय फरक दिसून येईल, याविषयी जाणून घेऊयात....
पुष्य नक्षत्र का महत्त्वाचे ?
पृथ्वीभोवती फेरी मारताना चंद्राच्या वाटेवर दिसणाऱ्या ताऱ्यांना नक्षत्र म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार नक्षत्रांचा आपल्या आयुष्यावर खूप परिणाम होतो. एकूण 27 नक्षत्र आहेत. त्यात पुष्य सगळ्यात चांगलं नक्षत्र आहे. पुष्य नक्षत्रामध्ये सुरु केलेल्या सगळ्या कामांना यश मिळते, असे मानले जाते.
677 वर्षांनी दुर्मिळ योग -
गुरुवारी पुष्य नक्षत्राचा योग असेल तर त्याला सिद्ध योग म्हटले जाते. यावर्षी दिवाळीच्या आधी 28 ऑक्टोबर 2021 ला पुष्य नक्षत्राचा योग आहे. यावेळी ज्या ग्रहदशेमध्ये पुष्य नक्षत्राचा योग येत आहे तो योग साधारणपणे 677 वर्षांनी येत आहे. याआधी असा योग 5 नोव्हेंबर 1344 ला आला होता. त्यावेळी गुरु – शनि युती मकर राशीमध्ये होऊन पुष्य योग गुरुवारी आला होता.