पुणे -पतीकडून पत्नीचा छळ होत असल्याच्या तक्रारी आपण अनेकदा ऐकल्या असतील. मात्र पुण्यात अगदी याउलट चित्र आहे. कारण पत्नीकडून पतीचा छळ होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. अशा प्रकरणात चूक पत्नीची असली तरीही सामाजिक दबावामुळे आरोपीच्या पिंजऱ्यात मात्र पतीलाच उभे राहावे लागते. लग्नानंतर पतीकडून पत्नीला होणारा त्रास हा गंभीर विषय असला तरी पत्नीकडून पतीला दिला जाणारा त्रास हादेखील सामाजिक प्रश्न बनला आहे.
कोरोना काळात 266 पुरुषांच्या तक्रारी
पुणे पोलिसांकडे 2020 साली कौटुंबिक हिंसाचाराच्या 2074 तक्रारी आल्या होत्या. त्यातील 791 अर्ज हे पुरुषांनी केले होते. तर यावर्षी आतापर्यंत 995 तक्रार अर्ज आले असून यातील 266 अर्ज हे पुरुषांचे आहेत. या आकडेवारीनुसार पाहिले असता महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना जास्त आहेत. परंतु पुरुषांच्या तक्रार अर्जाचे प्रमाण देखील वाढले आहे. यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात पुरुषांच्या तक्रारी कधी आल्या नव्हत्या, अशी माहिती पुणे पोलिसांच्या भरोसा कक्षात काम करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी सुजाता शानमे यांनी दिली.
'पती, पत्नी दोघांनाही समोरासमोर बसवून वाद मिटवतो'
सुजाता शानमे म्हणाल्या, यातील बहुतांश तक्रार अर्ज हे पत्नीने नांदायला यावे या स्वरूपाचे असतात. लॉकडाऊनमुळे एकटे रहावे लागत असल्यामुळे त्यांना नात्यांची किंमत कळली असल्यामुळे पत्नीने नांदायला यावे यासाठी पतींनी पोलिसात धाव घेतल्याच्या तक्रारी आहेत. अशावेळी पती, पत्नी दोघांनाही आम्ही समोरासमोर बसवून वाद मिटवतो आणि तोडगा काढतो.
'...यामुळे पुरुषांच्या तक्रारी जास्त'
भरोसा सेलमध्ये समुपदेशक म्हणून काम करणाऱ्या अॅड. प्रार्थना सदावर्ते म्हणाल्या, कोरोना काळात छळ होत असल्यामुळे आधीपेक्षा जास्त तक्रारी येत आहेत. कोरोनामुळे अनेकांना वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे. त्यामुळे पती-पत्नी हे पूर्वीपेक्षा जास्त वेळ एकमेकांच्या संपर्कात आले आहेत. एकमेकांसोबत जास्त वेळ राहिल्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे ऑफिसची कामे करण्याची आणि घरातील कामे सांभाळण्याची परिस्थिती अचानक उद्भवली आहे. त्यामुळे एकमेकांवर त्यांची चिडचिड होऊ लागली. याचा सर्वात जास्त परिणाम पुरुषांवर झाला. पत्नीच्या अपेक्षा आणि कामाचे 12 ते 14 तास यामध्ये पुरुष भरडला गेला. यामुळे त्यांच्यावर मानसिक ताण आला. त्यामुळे पुणे पोलिसांकडे यावर्षी पुरुषांच्या जास्त तक्रारी आल्या.
हेही वाचा -शरद पवार - प्रशांत किशोर भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...