पुणे- यंदा वेळेवर आलेल्या मान्सूनमध्ये काही काळ खंड पडला. मात्र थोड्याशा खंडानंतर अरबी समुद्रात मान्सूनला पुन्हा अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात पुढील पाच दिवस कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 48 तासात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुढील 48 तासात राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज पुढील पाच दिवस कोकण आणि गोव्यात पाऊस पडेल. मुंबईमध्ये पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पाच तारखेपर्यंत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सहा आणि सात तारखेनंतर पावसाचे प्रमाण कमी होईल. ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 48 तास जोरदार अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मध्य महाराष्ट्रात पुढील 48 तासात अनेक ठिकाणी सर्वदूर पाऊस पडेल. पाच तारखेनंतर अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर पुढील 48 तासात नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मात्र घाट माथ्यावर पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा आहे. पाच, सहा आणि सात तारखेला मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मात्र पाच ते सात तारखेला घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर मराठवाड्यातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद आणि लातूरला आज शुक्रवारी काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात आज शुक्रवारी अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. चार ते सात तारखेपर्यंत चार दिवस सर्वदूर पाऊस पडेल. मात्र सहा आणि सात तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.