पुणे - कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्या संदर्भात मार्गदर्शन सूचना गृह विभागाने जारी केले आहेत. यंदाही गणरायाची स्थापना तसेच विसर्जनाच्या मिरवणुकांवर बंदी असणार आहे. गणेश मंडळांना सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजनही करता येणार नाही. यावर पुण्यातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत सरकारने उत्सव हा उत्सवाप्रमाणे साजरा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी केली आहे.
पुणे येथिल गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांशी साधलेला संवाद 'राजकीय लोकांच्या कार्यक्रमांना गर्दी आणि आम्हाला बंदी' राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही अनेक राजकीय लोकांकडून सभा, आंदोलने, उद्घाटन कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमांना परवानगी दिली जाते. मात्र गणेश मंडळांच्याबाबतीत दुजाभाव का केला जातो. आज राज्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होतच आहे. नागरिक नियमांचे पालन करत आहे. अशा पद्धतीने गृह विभागाच्यावतीने नियमावली जाहीर करण्यात आली आहे, त्यात बदल करून यंदा गणेशोत्सवाला सूट देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी गणेश मंडळांनी केली आहे.
'सरकारने नियमावलीत बदल करावे'
कोरोना काळात सर्वाधिक सामाजिक काम गणेश मंडळांच्यावतीने करण्यात आले आहे. राज्य सरकारने जर यंदा गणेशोत्सवात काही सूट दिली, तर कार्यकर्ते स्वतःहा सर्व नियमाचा पालन करतील. पुण्यातील गणेशोत्सवाची ओळख जगभरात असून गेल्यावर्षीही निर्बंधात गणेशोत्सव साजरा करावा लागले आणि आत्ताही जर अशाच निर्बंधात गणेशोत्सव साजरा करण्यात येत असेल, तर कुठेतरी कार्यकर्त्यांच्या मनाला ठेच पोहचेल. सरकारने जी नियमावली जारी केली आहे, त्यात काहीतरी बदल करावे, अशी मागणीही यावेळी या कार्यकर्त्यांनी केली आहे.
'पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांनी बैठक घ्यावी'
पुण्यात मानाचे पाच गणेशोत्सव मंडळांबरोबर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ, अखिल मंडई मंडळ, भाऊ रंगारी गणेशोत्सव मंडळ, अशा विविध गणेशोत्सव मंडळांना 125 वर्षांची परंपरा आहे. अशा गणेश मंडळांनी योग्य ती भूमिका घेऊन सरकारकडे मागणी केली पाहिजे, असेही यावेळी या कार्यकर्त्यांनी सांगितले.
हेही वाचा-चिखलदऱ्यात साकारला जात आहे जगातील पहिला 'सिंगल रोपवे स्कायवॉक'