मुंबई - पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटला आग लागली आहे. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली आहे. कोव्हिशील्ड या लशीची निर्मिती या इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात येते. गुरुवारी (21 जानेवारी) दुपारी एक वाजता इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश मिळालं. मात्र या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दरम्यान पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आग विझल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली व त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
आगीत पाच जणांचा मृत्यू झाला-
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, “या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्राथमिक अंदाजानुसार या इमारतीचं बांधकाम सुरु होतं. तिथे विजेचं आणि वेल्डिंगचं काम सुरु होतं, त्यादरम्यान ही आग लागली असावी.”
“सुरुवातीला आम्हाला माहिती मिळाली होती की, इमारतीत चार जण अडकले आहेत. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर आम्हाला माहिती मिळाली की, या आगीत एक मजला जळून खाक झाला आहे, तसेच यावेळी पाच जण दगावले आहेत. मृतांमध्ये इमारतीच्या बांधकामावर काम करणारे कंत्राटी कामगार असू शकतात.”, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली.