पुणे - शहर तसेच उर्वरित भागात पावसाचा जोर वाढल्याने नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांत पाणीसाठा वाढल्याने मागील तीन दिवसांपासून खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठी राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून, आतापर्यंत 600 हून अधिक परिवारांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.
महापालिकेच्या नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत शहराच्या विविध भागातील ६२५ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. या कुटुंबांची राहण्याची व्यवस्था स्थानिक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर विभागली असून, सध्या पुराने प्रभावित झालेल्या भागांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
पूरस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले आहे. हे पथक महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत तैनात असून, गरज पडल्यास तत्काळ प्रभावित ठिकाणी पाठवण्यात येणार असल्याची माहिती नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनी दिली आहे.