पुणे- परत कोल्हापूरला जायचेच होते तर तुम्ही पुण्यात आलातच कशाला, असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आपण कोल्हापूरला परत जाणार असल्याचे वक्तव्य केले होते.
परत कोल्हापूरला जायचं होतं तर पुण्यात आलात कशाला? अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला
चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात कोल्हापूरला परत जाणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.
भाजपमधील एक नेता मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असे म्हणत असताना आता दुसरा नेता मी परत जाईन, परत जाईन, असे म्हणायला लागले आहेत. असे म्हणत अजित पवार यांनी पाटील यांच्या कोल्हापूराल परत जाण्याचा वक्तव्याचा त्यांच्या खास शैलीमध्ये समाचार घेतला. विविध खासगी बँकांनी सामाजिक बांधिलकी राखत त्यांच्या ‘सीएसआर’ (सामाजिक उत्तरदायित्व निधी) फंडातून ‘कोविड-१९’च्या लढाईसाठी केलेल्या कामांचे उद्घाटन तसेच विविध उपकरणांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. विधान भवनाच्या (कौन्सिल हॉल) सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते, यावेळी अजित पवारांनी चंद्रकात पाटील यांच्यावर निशाणा साधला.
अजित पवार पुढे म्हणाले, चंद्रकांत पाटील पुण्याचे लोकप्रतिनिधी आहेत. मात्र आता ते परत जाण्याची भाषा करत आहेत. मग परत जाणाऱ्या माणसांना मतदारसंघातील नागरिकांनी कामे कशी सांगायची, हा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकार गेल्यामुळे भाजपच्या नेत्यांचा तोल सुटला आहे. राष्ट्रवादीचे आमदार फोडताना त्यांना गारगार वाटते. आता आमच्या पक्षात आमदार येत असतील तर त्यांना वाईट वाटण्याचे कारण नाही, अशी टीकाही अजित पवार यांनी यावेळी केली.