महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सावधान..! भेसळयुक्त भगरीने कर्करोगाचा धोका; यकृत-किडणीवर होऊ शकतो परिणाम - भगरीतून विषबाधा

उपवासाच्या काळात भगर किंवा भगरीच्या पीठाचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. मात्र भेसळयुक्त भगर सेवनात आल्यास ती आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे समोर आले आहे. अशा भगरीमधून काही विषबाधेचे प्रकारही घडले आहेत. तसेच याच्या सेवनाने यकृत आणि किडणीवरही परिणाम होऊ शकतात, अशी माहिती इंडियन मेडीकल असोशियशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.

डॉ. अविनाश भोंडवे
डॉ. अविनाश भोंडवे

By

Published : Oct 9, 2021, 12:19 PM IST

Updated : Oct 16, 2021, 12:11 PM IST

पुणे- नवरात्र उत्सवात नागरिक नऊ दिवस उपवास करतात. या काळात फराळ म्हणून भगरीचे म्हणजेच वरईचे तांदुळ शिजवून सेवन केले जाते. तसेच भगरीपासून तयार केलेल्या पीठाचाही वापर या काळात मोठ्याप्रमाणत केला जातो. मात्र भगर किंवा भगरीच्या पीठाचा वापर अधिक प्रमाणात करत असताना त्यात भेसळयुक्त भगर सेवनात आल्यास आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे समोर आले आहे. अशा भगरीमधून काही विषबाधेचे प्रकारही घडले आहेत. तसेच याच्या सेवनाने यकृत आणि किडणीवरही परिणाम होऊ शकतात, अशी माहिती इंडियन मेडीकल असोशियशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे. त्याबाबत ईटीव्ही भारतचा हा सविस्तर वृत्तांत..

इंडियन मेडीकल असोशियशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे

वरईचे तांदूळ किंवा भगर हे कुठल्याही प्रकारचे धान्य किंवा दाणे नसून ते एका प्रकारचे गवत आणि त्या गवतामागील बिया असतात. त्या बिया त्याला पॉलिश करून त्याची भगर तयार केली जाते. तसेच ती भगर दळून त्याचे पीठही बाजारात उपलब्ध केले जाते. याच भगरीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर भेसळ होताना दिसून येत आहे. या भेसळीमधूनच विषबाधाही होताना दिसून येत आहे. या विषबाधेमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच हे भेसळयुक्त भगर दीर्घकाळ घेतले गेले तर त्याचा यकृतावर किंवा किडणीवर देखील परिणाम होऊ शकतो. तसेच यामधून कर्करोग देखील निष्पन्न होऊ शकतो, अशी माहितीही डॉ.अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.

तर त्याचा देखील होऊ शकतो त्रास -

भगरीमध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण हे खूप कमी असते. त्यात आर्यन फॅट आणि प्रोटीन हे मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळेच ती आरोग्यास पोषक मानली जाते. त्यामुळे भारतीय संस्कृतीत फराळ म्हणून उपवासासाठी भगरीचा सेवनाला प्राधान्य दिले जाते. परंतु गेल्या काही वर्षापासून असे लक्षात आले आहे, की या भगरीपासून विषबाधा होत असल्यचाा घटना घडत आहेत. भगर सेवन केल्यानंतर उलट्या, जुलाब, मळमळ होणे अश्या पद्धतीचे लक्षणे होतात.याचे कारण म्हणजे ही भगर भेसळयुक्त आहे. तसेच भगरीचे उत्पादन घेताना वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशके फवारली जातात. त्या कीटकनाशकांचा परिणामही आरोग्यावर होऊ शकतो, असेही भोंडवे यांनी स्पष्ट केले.

प्रशासनाने जनजागृती केल्यास भेसळयुक्त भगरीपासून होईल सुटका-

गेल्या अनेक वर्षांमध्ये असे आढळून आले आहे की भगरीच्या पीठात काही रासायनिक प्रक्रिया केलेल्या गोष्टी मिसळल्या जातात. यातून विषबाधा होण्याचे प्रमाण अधिक आहे. बाजारातून भगरीचे पीठ घेताना नागरिकांना हे लक्षात येत नाही, यामध्ये कशापद्धतीने भेसळ करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने याचा छडा लावण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे. परंतु यातून काहीही निष्पन्न झाले नसल्याचे समोर येत आहे. राज्यात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात भगर पिकवली जाते. तिथे याचे कारखाने देखील मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र नागरिकांमध्ये याबाबत जर जनजागृती केली गेली तर अशा भेसळयुक्त भगरीपासून नागरिकांची सुटका होऊन आरोग्याला धोका निर्माण होणार नसल्याचा विश्वास देखील डॉ. भोंडवे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - जालन्यात भगर खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांना विषबाधा

हेही वाचा - उपवास करणे आरोग्यासाठी चांगले आहे का?

Last Updated : Oct 16, 2021, 12:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details