पुणे : सातत्याने वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पुण्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. रुग्णालयात बेड तर अपुरे पडतच आहेत. सोबतच अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याने मनुष्यबळाचाही तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय कर्मचारी वाढविण्याची मागणी करत ससूनमधील निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण
पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड अपूरे पडत आहे. या परिस्थितीत ससून रुग्णालयात आता नव्याने काही बेड कोविड रुग्णांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मात्र बेड वाढवले तरी त्या ठिकाणी मनुष्यबळ कमी आहे. गेले काही दिवस या ठिकाणचे निवासी डॉक्टर विना विलगीकरण काम करत आहेत. मनुष्यबळ कमी असल्याने ताण येत असल्याचे या डॉक्टरांचे म्हणणे आहे.
85 डॉक्टरांना कोरोनाचील लागण
कोविड काळात काम करत असताना 450 निवासी डॉक्टरांपैकी 85 डॉक्टर हे सध्या पॉझिटिव्ह आहेत. एकीकडे रुगण संख्या वाढतच आहे दुसरीकडे इतर स्टाफची कमतरता आहे. त्यामुळे केवळ बेड वाढवून फायदा नाही तर इतर मेडिकल स्टाफ देखील वाढवला पाहिजे असे या निवासी डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे जर शासनाने यावर काही निर्णय नाही घेतला तर संपावर जाण्याचा इशारा ससून मधील निवासी डॉक्टरांनी दिला आहे.